एक वर्षानंतर 'आदिपुरूष'च्या अपयशाबद्दल दिग्दर्शक ओम राऊत यांनी सोडलं मौन
ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरूष’ चित्रपट जून २०२३ ला प्रदर्शित झाला. व्हिएफएक्स आणि संवाद यामुळे प्रचंड ट्रोल झालेला ‘आदिपुरूष’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली फारशी जादू दाखवली नाही. ६०० कोटींमध्ये तयार झालेल्या ह्या चित्रपटाने संपूर्ण जगभरामध्ये ४०० कोटींचीच कमाई केली होती. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच चित्रपटाला अनेक ट्रोलर्सने ट्रोल केलं होतं. व्हिएफएक्स, संवाद आणि रामायणातल्या पात्रामुळे प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. अशातच आता वर्षभरानंतर दिग्दर्शक ओम राऊत यांनी ‘आदिपुरूष’ चित्रपटाच्या अपयशावर भाष्य केलं आहे.
हे देखील वाचा – अतिश्रीमंतांच्या बॉलिवूडच्या किंग खानला मिळालं स्थान! शाहरुख खानची संपत्ती ऐकलीत का?
अमोल परचुरेला दिलेल्या मुलाखतीमध्ये ओम राऊतने सांगितलं की, “६०० कोटींचं बजेट असणाऱ्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ४०० कोटींची कमाई केली होती. पहिल्याच दिवशी चित्रपटाने एकट्या भारतात ७० कोटींची कमाई केली होती. जगभरातलं पहिल्या दिवसाचं कलेक्शन फार जास्त होतं आणि शिवाय चित्रपटाने जगभरात ४०० कोटींहून अधिकची कमाई केलेली होती. खरंतर चित्रपट कमाईच्या बाबतीत फ्लॉप ठरलेला नाही. कलेक्शनमध्ये निर्मात्याचं फारसं नुकसान झालेलं नाही. पण फार नुकसान झालं ते त्याच्याबद्दल पसरवलेल्या नकारात्मक गोष्टींचा. ”
“जर चित्रपटाबद्दल चांगला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असता तर, कमाईचा आकडा नियंत्रणात असता. कमाईचे आकडे चांगले वाढले असते. पुर्वीपासूनच चित्रपटाबद्दल नकारात्मक गोष्टी पसरवल्यामुळे कमाईबद्दल बरीच निराशा मिळाली. चित्रपटाबद्दल अनेक नकारात्मक गोष्टीच लिहिल्या गेल्या होत्या. पण असं असलं तरीही कौतुकाचेही मेसेज आम्हाला चाहत्यांनी पाठवले होते. नकारात्मक गोष्टींमुळे लोकांच्या मनात चित्रपटाबद्दल फार नकारात्मकच गोष्टी भावना पेरल्या गेल्या. आणि त्याला कारणीभूत ठरलं ते सोशल मीडिया…”