बॉलिवूड अभिनेत्रीने अमेरिकेच्या निवडणुकीत केले मतदान, पोस्ट करत ट्रम्प यांच्या विजयावर व्यक्त केली नाराजी
अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक नुकतीच पार पडली. यासाठी मंगळवारी (५ नोव्हेंबर) मतदान झाले होते. या निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस आणि माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यात प्रामुख्याने लढत पाहिला मिळाली. या निवडणूकीचे निकाल काही तासांपूर्वीच हाती आले असून डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा एकदा विजयी झाले आहेत. डोनाल्ड ट्रम्प आता लवकरच अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शप्पथ घेणार आहेत. दरम्यान, ट्रम्प यांचा निवडणूकीत विजय झाल्यानंतर जगभरातल्या अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला असला तरीही काही सेलिब्रिटींनी त्यांच्यावर टीकाही केली आहे.
अशातच एका भारतीय अभिनेत्रीनेही त्यांच्यावर टीका केली आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री आकांक्षा रंजन कपूर आहे. खरंतर, आकांक्षाकडे अमेरिकेचं नागरिकत्व आहे. ३१ वर्षीय आकांक्षा आलिया भट्टची फार जवळची मैत्रिण आहे. तिने सोशल मीडियावर काल मी मतदान केलं असल्याचा फोटो शेअर केला होता. शिवाय तिने कोणाला मतदान केलं, याबद्दलही तिने चाहत्यांना सांगितले. मुळची भारतीय असलेली आकांक्षा अमेरिकेची नागरिक असल्याचे कळताच तिच्या चाहत्यांना धक्काच बसला आहे. अमेरिकेच्या निवडणुकीत लागलेल्या निकालाच्या अभिनेत्री विरोधात आहे. ती कमला हॅरिस यांना पाठिंबा देत असून ट्रम्प यांच्या विजयावर तिने नाराजी दर्शवली आहे.
शेअर केलेल्या इन्स्टा स्टोरीमध्ये आकांक्षा म्हणते, “हे पचवणं कठीण आहे. महिलांच्या अधिकाराचा पराजय, पर्यावरणाच्या संरक्षणाची हार, अल्पसंख्यांकांसाठीच्या सहानुभूतीची हार, हिंसाचारावर प्रतिबंधाची हार, दुराचरण, द्वेष आणि वंशवाद जिंकला. महिलांवर आक्षेपार्ह्य टिप्पणी करणारा माणूस जिंकला. पण असो, स्टॉक मार्केट काही काळासाठी तरी का होईना वर येईल…” शिवाय, आकांक्षाने इस्राईलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी ट्रम्पचे अभिनंदन केलेले ट्वीट शेअर करत लिहिले की, ‘आता आणखी युद्ध आणि मृत्यूसाठी सज्ज व्हा… एन्जॉय द कलयुग मित्रांनो…”
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आकांक्षा रंजन कपूर आणि आलिया भट्ट या दोघीही बालपणापासूनच्या मैत्रिणी आहेत. दोघीही एकाच शाळेतही शिकलेल्या असून फार चांगल्या बेस्ट फ्रेंड्सही त्या आहेत. आकांक्षा रंजन कपूर ही अभिनेता-दिग्दर्शक शशी रंजन आणि त्यांची पत्नी अनु रंजन यांची मुलगी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आकांक्षाचा जन्म मुंबईत झाला असून तिचं शिक्षण मुंबईच्या जमनाबाई नरसी स्कूलमधून झाले आहे. आलियाच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ‘जिगरा’ सिनेमात आकांक्षाची झलक दिसली होती. आकांक्षाने २०२० मध्ये नेटफ्लिक्सवरील ‘गिल्टी’ चित्रपटामध्ये दिसली होती. शिवाय, आकांक्षाने नेटफ्लिक्सवरील ‘मोनिका ओ माय डार्लिंग’ चित्रपटामध्येही भूमिका साकारली.