अभिनेते अभिताभ बच्चन यांचा देशाच्या 'महानायक' यांच्या निधनावर शोक; म्हणाले 'स्वर्गातले आमचे नायक...'
२०२४ हे वर्ष संपून तीन दिवस झाले आहेत. अगदी धुमधडाक्यात आणि हर्षोल्हासात आपण सर्वांनीच २०२५ वर्षाचं स्वागत केलं. पण असलं तरीही २०२४ वर्षामध्ये घडलेल्या काही गोष्टींमुळे आपल्या सर्वांच्याच मनाला चटका बसला आहे. २०२४ वर्षामध्ये अवघ्या देशाने चार दिग्गज महानायकांना गमावले. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, उद्योगपती रतन टाटा, प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन आणि प्रसिद्ध सिनेनिर्माते श्याम बेनेगल या चौघांच्या निधनानंतर एका युगाचा अंत झाल्याची भावना प्रत्येक भारतीयाच्या मनात आहे. या चारही महानायकांसाठी बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एक मार्मिक फोटो शेअर करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
अमिताभ बच्चन यांनी इन्स्टाग्रामवर “हा फोटोच सर्वकाही सांगतोय…” असं कॅप्शन दिलं आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये बिग बींनी दिवंगत उद्योगपती रतन टाटा, चित्रपट निर्माते श्याम बेनेगल, तबला वादक झाकीर हुसेन आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा ॲनिमेटेड फोटो शेअर केले आहेत. या फोटोवर एक नोट लिहिली आहे, “२०२४ मध्ये एक पारसी, एक मुस्लिम, एक शीख आणि एक हिंदू यांचे निधन झाले आणि संपूर्ण देश त्यांना फक्त भारतीय म्हणून ओळखतो.”असेही लिहिले आहे. बिग बींनी शेअर केलेला फोटो साधा पण प्रभावी आहे, एकता, आदर, बंधुता आणि आठवणींना उजाळा देणारा हा फोटो आहे.
बिग बी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर “स्वर्गातील आमचे नायक” या शीर्षकासह चारही दिग्गजांचे ॲनिमेटेड फोटो पोस्ट केले आहेत. बिग बींनी शेअर केलेल्या या पोस्टवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव केला जात असून चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव केला जात आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे २६ डिसेंबर रोजी वयाच्या ९२ व्या वर्षी दिल्लीत निधन झाले. तर, २३ डिसेंबर रोजी, भारतीय चित्रपटसृष्टीत क्रांती घडवणारे दिग्गज सिनेनिर्माते श्याम बेनेगल यांचे वयाच्या ९० व्या वर्षी दीर्घकालीन मूत्रपिंडाच्या आजाराने निधन झाले. टाटा समूहाचे माजी अध्यक्ष, भारतीय उद्योगमहर्षी रतन टाटा यांचे १० ऑक्टोबर रोजी ८६ व्या वर्षी निधन झाले. तर, जगप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसेन यांनी १५ डिसेंबर रोजी ७३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. या चारही महानायकांच्या निधनामुळे देशाचे नुकसान झाले आहे. आणि हे नुकसान केव्हाही भरुन न निघणारे आहे.
“…ते तुझ्या संघर्षाचे फळ आहे”, अभिनेता किरण मानेंची क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंसाठी खास पोस्ट