फोटो सौजन्य - Social Media
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत असलेलं आणि सोशल मीडियावर गाजत असलेलं “सखूबाई” हे गाणं अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘आतली बातमी फुटली’ या आगामी मराठी चित्रपटातील हे पहिले आयटम सॉंग असून त्यामध्ये महाराष्ट्राची लोकप्रिय गौतमी पाटील आणि विनोदाचा बादशाह सिद्धार्थ जाधव यांचा जबरदस्त जलवा पाहायला मिळतो. सखूबाई कोण, यावर सोशल मीडियावर अनेक तर्कवितर्क लावले जात होते. अखेर तिचा पडद्यावर धमाकेदार प्रवेश झाला आहे.
‘वीजी फिल्म्स’च्या बॅनरखाली दिग्दर्शक विशाल पी. गांधी आणि जैनेश इजरदार यांनी तयार केलेल्या ‘आतली बातमी फुटली’ या चित्रपटात प्रेक्षकांना भरपूर मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. चित्रपट येत्या १९ सप्टेंबर २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील ‘सखूबाई’ हे गाणं सध्या चाहत्यांच्या ओठांवर असून, त्याची व्हिज्युअल झलक तितकीच रंगतदार आणि दमदार आहे.
गाण्याला संगीत एग्नेल रोमन यांनी दिलं असून, बोल चैतन्य कुलकर्णी यांनी लिहिले आहेत. हे गाणं सोनाली सोनावणे हिच्या आवाजात आहे, आणि तिच्या जोशपूर्ण गायनामुळे गाण्याला एक वेगळीच उंची मिळाली आहे. सिद्धार्थ आणि गौतमी यांची केमिस्ट्री, डान्स आणि एनर्जी यामुळे हे गाणं पूर्णपणे मनोरंजनाचा डोस आहे. प्रेक्षकांना थिरकायला लावणारे हे आयटम सॉंग थिएटरमध्ये जल्लोष निर्माण करणार, याची खात्री आहे.
चित्रपटाची निर्मिती विशाल गांधी आणि ग्रीष्मा अडवाणी यांची असून, सहनिर्माता अम्मन अडवाणी आहेत. कथालेखन जैनेश इजरदार यांचे असून पटकथा व संवाद लेखनात जीवक मुनतोडे, अद्वैत करंबेळकर यांचे योगदान आहे. नृत्यदिग्दर्शन राहुल ठोंबरे आणि तिजो जॉर्ज यांनी केलं असून, वेशभूषा ग्रीष्मा अडवाणी, छायांकन अमित सुरेश कोडोथ आणि संकलन रवी चव्हाण यांनी केलं आहे.
‘सखूबाई’ गाण्यामुळे ‘आतली बातमी फुटली’ या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. या चित्रपटाकडून मनोरंजनाची पूर्ण हमी असून, सिद्धार्थ आणि गौतमीचा जलवा प्रेक्षकांच्या मनात ठसा उमटवणार हे निश्चित!