“५० लाख दे अन्यथा…”, प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्रीला जीवे मारण्याची धमकी
सलमान खान आणि शाहरूख खाननंतर आणखी एक प्रसिद्ध भोजपूरी अभिनेत्रीला धमकीचा कॉल आला आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणीही नसून प्रसिद्ध भोजपूरी अभिनेत्री अक्षरा सिंग आहे. बिग बॉस ओटीटी १ च्या माध्यमातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री अक्षरा सिंग सध्या चर्चेत आली आहे. तिला अलिकडेच धमकीचा फोन आला होता. तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून तिच्याकडून तब्बल ५० लाखांचीही खंडणी मागण्यात आलेली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अक्षराला ही खंडणीची रक्कम येत्या दोन दिवसांत देण्याची मुदत देण्यात आलीये. अभिनेत्रीला धमकीचा कॉल आल्यानंतर तिच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ११ नोव्हेंबरच्या रात्री अक्षराच्या मोबाईलवर दोन वेगवेगळ्या नंबरवरून फोन आले होते. अभिनेत्रीला पहिला फोन रात्री १२ वाजून २० मिनिटांनी आला होता. तर दुसरा फोन रात्री १२ वाजून २१ मिनिटांनी आला होता. एक मिनिटांच्या अंतराने हा फोन आल्यामुळे अभिनेत्रीने तात्काळ पोलिस स्थानकांत धाव घेतली होती.
दोन दिवसांत पैसे न दिल्यास जीवे मारेन, अशी धमकीही अभिनेत्रीला देण्यात आली आहे. त्या व्यक्तीने कॉलवर पैसेच मागितले नाही तर अभिनेत्रीवर शिवीगाळही केल्याची माहिती मिळत आहे. अभिनेत्रीने पोलिस ठाण्यात लेखी अर्ज देत गुन्हा दाखल केला आहे. धमकीच्या फोनची पोलिस तक्रार अक्षराने बिहारच्या दानापूर पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. अभिनेत्री बिहारची रहिवासी आहे. आरोपीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अभिनेत्रीने पोलिसांकडे केली आहे.
अक्षरा सिंगने खंडणी आणि खुनाच्या आरोपाखाली तक्रार दाखल केल्याचे पोलीस स्टेशनचे प्रभारी प्रशांत कुमार भारद्वाज म्हणाले की, “परिस्थितीचा तपास केला जात आहे. फोन करणाऱ्याची लवकरच ओळख पटवली जाईल. गुन्हेगाराची ओळख पटवून त्याला अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत,” अशी माहिती दानापूर पोलिस ठाण्याचे प्रभारी प्रशांत कुमार भारद्वाज यांनी मनी कंट्रोल वेबसाईटसोबत बोलताना दिली.
भोजपूरी इंडस्ट्रीतील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये अक्षरा सिंगची गणती केली जाते. तिने २०१० मध्ये रिलीज झालेल्या ‘सत्यमेव जयते’ चित्रपटातून रवी किशन यांच्यासोबत ‘सत्यमेव जयते’ चित्रपटातून सिनेविश्वात पाऊल ठेवलं. बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या सीझनमध्ये अक्षराने सहभागी घेतला होता. भोजपुरी चित्रपटांसह तिने अनेक मालिकांमध्येही सुद्धा काम केलं आहे. ‘सत्या’, ‘तबादला’ आणि ‘मां तुझे सलाम’ सारख्या चित्रपटांत अक्षराने काम केलंय. अभिनयाव्यतिरिक्त अक्षरा तिच्या गाण्यांसाठीही प्रसिद्ध आहे.