"माणूस दिसायला हडकुळा, पण छातीत..."; अभिनेता किरण मानेची राष्ट्रपिता महात्मा गांधींसाठी खास पोस्ट
दरवर्षी २ ऑक्टोबरला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती देशभरामध्ये साजरी केली जाते. महात्मा गांधीजींनी जगाला अहिंसा आणि सत्याच्या मार्गाने जाण्याची शिकवण दिली. त्यांच्या महान कार्यामुळे देशातील जनतेने त्यांना ‘राष्ट्रपिता’ ही पदवी दिली. आज त्यांच्या जयंतीनिमित्त मराठी अभिनेते किरण माने यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेता किरण माने एक उत्तम अभिनेते असून ते राजकारणातही सक्रिय आहेत. बिग बॉस मराठी ४ मधून प्रकाशझोतात राहिलेले ‘सातारचा बच्चन’ अर्थात किरण माने सध्या प्रेक्षकांमध्ये चर्चेत आहे. काही तासांपूर्वीच त्यांनी इन्स्टाग्रामवर गांधी जयंतीनिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे.
शेअर केलेल्या पोस्टमध्ये किरण माने म्हणतात, “…माणूस दिसायला हडकुळा होता. किरकोळ शरीरयष्टी. छातीचा पिंजरा दिसत होता… पण माझ्या भावा, त्या छातीत असा दम होता की आजसुद्धा अख्खं जग त्याला झुकून सलाम करतं ! ही होती फक्त विचारांची ताकद. अमेरिका-इंग्लंड-जर्मनी-कोरीया… पृथ्वीवरच्या कुठल्याबी देशात जा.. कुठंही… आज गांधीबाबाच्या विचारांनी प्रभावित झालेली तर त्यांच्या पुतळ्यापुढं नतमस्तक झालेली दिसतीलच… पण त्यांची एरवी निंदानालस्ती करणार्यांनाबी त्याच्यापुढं मान खाली घालून वाकून झुकावं लागलेलं दिसतं.”
“एखादा नेता कितीही ओरडुन बोलला – घसा फाडूफाडून बोलला – प्रोपोगंडा पिक्चर काढून डॉल्बी डिजीटलवर बोलला… तरी त्याच्या बोलण्यात ‘सत्याचा अंश’ नसेल तर जगाच्या बाजारात त्या बोलण्याला घंटा किंमत मिळत नसते. या महात्म्याचा आवाज खणखणीत नव्हता की चालण्यात रूबाब नव्हता.. वाकून काठी टेकत-टेकत हज्जारो लोकांसमोर तो यायचा.. पालथी मांडी घालून बसायचा आणि बसक्या आवाजात बोलत रहायचा. आवाजात चढउतार नाहीत की टाळीबाज-चटपटीत वाक्यं नाहीत… पण त्याच्या विचारांत ‘निर्मळ’पणा होता – शब्दाशब्दांत भारतमातेवरची माया होती – रक्ताच्या थेंबाथेंबात आपल्या मातीतल्या गोरगरीबांसाठीची आस होती – मानवतेची कास होती – ‘सत्याची’ ताकद होती.”
“गोळ्या घालुन मारला बाबाला… पण तरीबी जिवंत राहिला. शत्रूच्या नाकावर टिच्चून. जगातला एक देश असा नाही जिथं त्याचा विचार पोचला नाही. खायचं काम नाही गड्याहो… ह्यांच्या हज्जार पिढ्या खपतील तो ‘विचार’ संपवायला पण ‘गांधी’ उसळी मारून वर येतच रहाणार. सलाम महात्म्या सलाम… कडकडीत सलाम..”