सलमान खानचा जीव पुन्हा धोक्यात? अज्ञात व्यक्तीकडून इमारतीत घुसखोरी
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सलमान खान राहत असलेल्या बांद्रामधील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये एका अज्ञात व्यक्तीने घुसखोरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अज्ञात व्यक्तीचा घुसखोरीचा प्रकार पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर तातडीने त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. चौकशीनंतर जितेंद्र कुमार सिंह असे संबंधित व्यक्तीचे नाव असल्याचे समजले. तो छत्तीसगढचा रहिवासी आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सलमान खानला यापूर्वी जीवे मारण्याची धमकी अनेकदा आली होती. या पार्श्वभूमीवर घराबाहेर सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
यापूर्वी सुद्धा अनेकदा सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या मिळालेल्या आहेत. केव्हा पोलिसांना धमकीचा ई-मेल, केव्हा व्हॉट्सॲप वरुन मेसेज तर केव्हा कॉलच्या माध्यमातून अभिनेत्याला धमकी मिळाली. तर एकदा त्याच्या घरावरही एका अज्ञताकडून गोळीबार करण्यात आला होता. अभिनेत्याच्या घरावर तो गोळीबार लॉरेन्स बिश्नोई गँगकडून गोळीबार करण्यात आला होता. सलमान खानच्या इमारतीमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणारा व्यक्तीचा नेमका हेतू काय होता, हे कळू शकलेला नाही. सध्या मुंबई पोलिस त्या व्यक्तीची कसून चौकशी करीत आहे.
यापूर्वी, सैफ अली खानच्या घरात एक अज्ञात व्यक्ती घुसला होता. त्याने सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यात अभिनेता जखमी झाला होता. त्याचप्रमाणे सलमान खानच्या घरातही हल्ला करण्याचा प्रयत्न हा त्या घुसखोराचा प्रयत्न होता का ? हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. सलमान खान गेल्या काही दिवसांपासून त्याच्या कामामुळे चर्चेत आहे.