माधुरी दीक्षितलाही करावा लागला होता बॉडी शेमिंगचा सामना, स्वतःच सांगितला किस्सा
‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षित आजही लाखो तरूणांच्या हृदयाची धडकन आहे. तिचं मोहक हास्य पाहिलं की, आजही कित्येक जण तिच्यावर फिदा होतात. दरम्यान, माधुरीने आपल्या दमदार अभिनय कौशल्याच्या जोरावर आणि सौंदर्याच्या माध्यमातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. कायमच वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत राहणारी माधुरी दीक्षित आज तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. एका मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने तिच्या करियरच्या सुरुवातीच्या काळाबद्दल भाष्य केलं आहे. तिलाही करियरच्या सुरूवातीच्या काळात शरीरावरून टीका सहन करावी लागली होती, असं सांगितलं आहे.
‘आर्यन्स सन्मान’ चित्रपट-नाटक सोहळ्याची नामांकने घोषित…
करियरच्या सुरूवातीच्या काळात माधुरीला अनेक चढ- उताराचा सामना करावा लागला होता. करियरच्या सुरुवातीच्या दिवसांत अभिनेत्रीला काही वाईट गोष्टींचाही सामना करावा लागला असल्याचे तिने सांगितले आहे. बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत माधुरी दीक्षितने सांगितले की, “माझ्या करियरच्या दिवसांत मला अनेक लोकं शरीरयष्टीने खूप बारीकच समजायचे. ‘ही हिरोईन आहे? हिला जरा जाड करा,’असं ही मला काही लोकं म्हणायचे. मला वाटत नाही की, ही आता इतकी मोठी समस्या आहे.” अभिनयासोबतच माधुरी तिच्या उत्कृष्ट नृत्य कौशल्यासाठी देखील ओळखली जाते. तिने कथ्थक नृत्यशैलीचे विशेष प्रशिक्षण घेतले आहे. लग्न आणि दोन मुलं झाल्यावरही तिने डान्समध्ये स्वत:चं करियर करणं सोडलं नाही.
एका मुलाखतीत माधुरीने सांगितलं की, इंडस्ट्रीतल्या अनेक लोकांनी तिच्यावर कामावरूनही टीका केली होती. ती म्हणाली, “वेगवेगळी लोकं वेगवेगळे विचार करत असतात. बरेच लोकं म्हणायचे की, तू आई झाली आहेस, आता तू का नाचते आहेस. तू बस, तू घर सांभाळ, तू हे कर, तू ते कर.” माधुरी दीक्षित बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वांत यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. तिला २००८ साली भारतातील चौथ्या क्रमांकाचा नागरी सन्मान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आजही तिच्या अदाकारीने ती चाहत्यांना मंत्रमुग्ध करते आणि ती अनेकांची क्रश राहिली आहे.
माधुरी दीक्षितने १९८४ साली रिलीज झालेल्या ‘अबोध’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. यानंतर तिने एकामागून एक अनेक चित्रपटांमध्ये काम केले. माधुरी शेवटची २०२२ मध्ये रिलीज झालेल्या ‘मजा माँ’ चित्रपटामध्ये दिसली होती. यानंतर तिने २०२३ मध्ये रिलीज झालेल्या ‘पंचक’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली. दरम्यान, अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केले आहे. ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या यादीत ‘राजा’, ‘हम आपके है कौन’, ‘बेटा’, ‘तेजाब’ यांसह अनेक चित्रपटांचा समावेश होतो. माधुरी नुकतीच ‘भूल भुलैया ३’चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. यामध्ये माधुरी दीक्षितसह विद्या बालन, कार्तिक आर्यन आणि तृप्ती डिमरीसुद्धा प्रमुख भूमिकेत होती.