(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉलीवूड सुपरहिरो चित्रपटांबद्दल बोलताना क्रिश फ्रँचायझीचा उल्लेख न होणे हे शक्यच नाही आहे. राकेश रोशनच्या या यशस्वी चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. या फ्रँचायझीच्या चौथ्या भागाबाबत एक मोठी अपडेट आता समोर आली आहे. यावेळी हृतिक रोशन स्वतः या चित्रपटाच्या दिग्दर्शकाची जबाबदारी स्वीकारताना दिसणार आहे आणि हा चित्रपट २०२७ मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. मुलाखतीत स्वतः राकेश रोशन यांनी ही अपडेट शेअर केली आहे.
चित्रपटाची शूटिंग कधी होणार सुरु ?
राकेश रोशन यांनी ‘बॉलीवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे की, चित्रपटाचे शूटिंग २०२६ च्या मध्यात सुरू होणार आहे. त्यांनी सांगितले की, पटकथेला जास्त वेळ लागला नाही, परंतु चित्रपटाचे बजेट ठरवण्यासाठी सर्वात जास्त मेहनत घ्यावी लागली. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा चित्रपट असल्याने, प्री-प्रॉडक्शनवर विशेष लक्ष दिले जात आहे.
हा चित्रपट का आहे खास?
क्रिश फ्रँचायझीची सुरुवात २००३ मध्ये ‘कोई मिल गया’ या चित्रपटाने झाली होती, ज्यामध्ये जादू नावाचा एलियन मुलांचा आणि मोठ्यांचा आवडता झाला होता. त्यानंतर २००६ मध्ये ‘क्रिश’ आणि २०१३ मध्ये ‘क्रिश ३’ आला. आता जवळजवळ १४ वर्षांनी या चित्रपटाचा चौथा भाग प्रेक्षकांसमोर येणार आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर, ‘क्रिश ४’ कडून लोकांना खूप अपेक्षा आहेत. आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यास किती यशस्वी ठरतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
हृतिक रोशनची नवीन जबाबदारी
आतापर्यंत राकेश रोशन या फ्रँचायझीचे दिग्दर्शन करत होते, परंतु पहिल्यांदाच हृतिक रोशन दिग्दर्शक म्हणून आता प्रेक्षकांना दिसणार आहे. त्यांनी एका कार्यक्रमात म्हटले होते की त्यांच्या आत नेहमीच एक चित्रपट निर्माता लपलेला असतो आणि आता त्यांना ते आव्हान स्वीकारण्याची वेळ आली आहे. त्यांनी असेही कबूल केले की ते घाबरलेले आणि उत्सुक आहेत, परंतु ही भीती त्यांना नवीन गोष्टी शिकण्यास आणि पुढे जाण्यास प्रेरित करेल.
वडिलांनी हृतिकच्या दिग्दर्शनावर केले भाष्य
राकेश रोशन यांनी त्यांचा मुलगा हृतिक दिग्दर्शनात पाऊल ठेवल्याबद्दलही सांगितले. ते म्हणाले की ज्याप्रमाणे त्यांनी २५ वर्षांपूर्वी ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटाद्वारे हृतिकला जगासमोर आणले होते, त्याचप्रमाणे तो पुन्हा एकदा त्याची ओळख करून देणार आहे पण यावेळी दिग्दर्शक म्हणून. हृतिकचे दिग्दर्शनावरील पदार्पण पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.