(फोटो सौजन्य - Instagram)
मराठी चित्रपटसृष्टीमध्ये नेहमीच नावीन्यपू्र्ण विषय हाताळले जात आहेत. आजवर वेगवेगळ्या कथानकांतून मराठी चित्रपटांनी समाजातले अनेक प्रश्न हाताळले आहेत. मराठी चित्रपट नेहमीच आशयघन, दर्जेदार आणि दमदार कलाकार आणि कथानकांसाठी ओळखला जातो. मराठी चित्रपटाने आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील आपला ठसा चांगलाच उमटवला आहे. अशाच सामाजिक वास्तवावर भाष्य करणारा आणि माणसाच्या भावनिक संघर्षाचा वेध घेणारा ‘पायवाटाची सावली’ हा नवा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट ३० मे रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
‘मीना शमीम फिल्म्स’ प्रस्तुत ‘पायवाटाची सावली’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची आणि लिखाणाची जबाबदारी मुन्नावर शमीम भगत यांनी सांभाळली आहे. या चित्रपटाबाबत आपला अनुभव सांगताना लेखक-दिग्दर्शक मुन्नावर शमीम भगत म्हणाले, “मी याआधी तीन मराठी चित्रपट केले होते आणि ‘पायवाटाची सावली’ हा माझा चौथा मराठी चित्रपट आहे. या चित्रपटाचं कथानक मी अनेक वर्षांपूर्वी लिहून ठेवलं होतं. एके दिवशी मला सुचवण्यात आलं की या कथानकावर चित्रपट करायला हवा, आणि अखेर आता मला ही संधी मिळाली.”
ते पुढे म्हणाले, “मी यापूर्वी ‘निवडुंग’, ‘गाव पुढे आहे’ यांसारखे चित्रपट केले. एकदा कोल्हापूरमध्ये काही मुलं नाटक सादर करत होती. त्यांच्या अभिनयाने मी खूप प्रभावित झालो आणि त्यांनाच या चित्रपटात संधी दिली. ‘पायवाटाची सावली’ने आतापर्यंत विविध चित्रपट महोत्सवांमध्ये तेवीस पुरस्कार मिळवले आहेत, आणि ही गोष्ट आमच्यासाठी खूपच अभिमानाची आहे.”
मुन्नावर शमीम भगत यांनी चित्रपटाच्या आशयावर पुढे म्हटले, “आयुष्यात कधी कधी अशा टप्प्यावर आपण पोहोचतो, जिथे वाटतं की सर्वकाही संपलंय, आपण हरलो आहोत. पण अशावेळी कुठूनतरी आशेचा एक किरण समोर येतो. या चित्रपटातून आम्ही हेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे की, अपयश आलं तरीही निराश होता कामा नये. देव नेहमी आपल्या पाठीशी असतो.” मुन्नावर शमीम भगत यांनी यावेळी हेही स्पष्ट केलं की, “या चित्रपटात मी एकाच वेळी लेखक, दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता अशी सर्व भूमिका सांभाळल्या आहेत. मला हिंदी, इंग्रजी आणि मराठी या तिन्ही भाषा उत्तम अवगत असल्यामुळे काम करताना फारशी अडचण आली नाही. लहानपणापासूनच मला सिनेमाची ओढ होती, आणि मी तर स्वप्नातही सिनेमा पाहायचो.”
‘हेरा फेरी ३’ सोडल्यानंतर परेश रावल यांना चाहत्याने दिली धमकी; म्हणाला, ‘… नाहीतर मी माझी नस कापेल’
या चित्रपटात प्रसाद माळी, रेवती अय्यर, रोशनी चौबे, संजय टिपूगडे, मुन्नावर शमीम भगत, एन. डी. चौघुले, शाल्वी शाह आणि शीतल भोसले यांसारखे कलाकार झळकणार आहेत. चित्रपटाची निर्मिती ‘मीना शमीम फिल्म्स’ने केली असून, संपूर्ण चित्रपटासाठी संगीत अमित अनिल बिश्वास यांनी दिलं आहे. समीर सक्सेना यांनी एक्झिक्युटिव्ह प्रोड्यूसर आणि सिंडीकेशनची भूमिका पार पाडली आहे. या चित्रपटाचे वितरक अकात डिस्ट्रीब्यूशनचे संस्थापक चंद्रकांत विसपुते यांच्याकडे आहे. तर ‘पायवाटाची सावली’तील ‘काका’ ही भूमिका स्वतः मुन्नावर शमीम भगत यांनीच साकारली आहे. एका लेखकाचा खडतर प्रवास या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जो सगळ्यांना ३० मे रोजी पाहता येणार आहे.