
फोटो सौजन्य - Social Media
दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या ‘बाहुबली’ फ्रँचायझीने भारतीय चित्रपटसृष्टीला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून दिली. भव्य दृश्यरचना, दमदार कथा आणि प्रभावी अभिनयामुळे या मालिकेने बॉक्स ऑफिसवर विक्रमी यश मिळवले. आता या सुपरहिट मालिकेच्या तिसऱ्या भागाबाबत पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे ‘बाहुबली 3’ लवकरच येणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे.
‘Baahubali: The Torchbearer’ या माहितीपटातील एक व्हिडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये प्रभास, राणा दग्गुबाती आणि अनुष्का शेट्टी तिसऱ्या भागाबाबत सूचक संकेत देताना दिसत आहेत. त्यामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
व्हायरल क्लिपमध्ये राणा दग्गुबाती म्हणतो, “मला माहीत नाही हे सगळ्यांसमोर बोलायला हवं की नाही. राजामौली सर आणि शोभू गरू इथे नाहीत, त्यामुळे मनातलं सांगतो. कदाचित जग अजून तयार नसेल… पण ‘बाहुबली’…” एवढे बोलून तो थांबतो. त्यानंतर प्रभास हसत तीन बोटं दाखवतो आणि अनुष्कासह सर्वजण हसू लागतात. व्हिडिओच्या शेवटी “And the legacy continues!” हा संदेशही झळकतो.
या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात उमटत आहेत. अनेकांनी याला ‘बाहुबली 3’चा मोठा इशारा मानले असून, लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. काही चाहत्यांनी तर तिसरा भाग निश्चित असल्याचा दावा करत उत्साह व्यक्त केला आहे.
तथापि, ‘बाहुबली 3’बाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. चित्रपटाची निर्मिती कधी सुरू होणार, कथा कोणत्या दिशेने जाणार किंवा हा प्रकल्प चित्रपटाच्या स्वरूपात येणार की अन्य कोणत्या माध्यमातून, याबाबत निर्माते किंवा एस. एस. राजामौली यांनी अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. दरम्यान, ‘बाहुबली: द बिगिनिंग’ २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता, तर ‘बाहुबली: द कन्क्लुजन’ ने जगभरात सुमारे १,७८८ कोटी रुपयांची कमाई करत भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक यशस्वी चित्रपटांमध्ये स्थान मिळवले. प्रभास, राणा दग्गुबाती, अनुष्का शेट्टी, तमन्ना भाटिया, रम्या कृष्णन, सत्यराज आणि नासर यांच्या दमदार अभिनयाने सजलेल्या या फ्रँचायझीच्या तिसऱ्या भागाची अधिकृत घोषणा कधी होणार, याकडे आता सर्व चाहत्यांचे लक्ष लागले आहे.