होय, मीच हल्ला केला...! आरोपीने दिली पोलिसांसमोर कबुली
Saif Ali Khan attac News In Marathi: अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादबाबत नवीन खुलासे समोर येत आहेत. आरोपीने पोलिसांना सांगितले की तो बांगलादेशात कुस्तीपटू आहे. आरोपीच्या म्हणण्यानुसार, त्याने जिल्हा तसेच राष्ट्रीय पातळीवर कुस्ती खेळली आहे. आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादने पोलिसांना सांगितले की तो बांगलादेशात एक कुस्तीगीर होता आणि कमी वजनाच्या गटात कुस्ती खेळायचा. कुस्तीगीर असल्याने तो सैफ अली खानवर हल्ला करण्यात यशस्वी झाला.याचसंदर्भात हल्लेखोराने मुंबई पोलिसासमोर कबुली दिली आहे.
अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी गजाआड केले आहे. चौकशीदरम्यान आरोप सैफच्या घरात कसा शिरला, याची माहिती दिली आहे. इमारतीमध्ये अपुरी सुरक्षाव्यवस्था मागील बाजूला सीसीटीव्ही नसल्याचा त्याने फायदा घेतला. आपत्कालीन स्थिती बाहेर पडण्याचा मार्गाने तो अकराव्या मजल्यापर्यंत पोहचला. त्यानंतर डक्टमधून त्याने बाथरूमध्ये प्रवेश केल्याचे आरोपीने पोलिसांसमोर कबुली दिली आहे.
सैफ अली खानच्या घरी काही महिन्यांपूर्वी एक पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीसाठी सैफ अली खानने एक खासगी हाउसकीपिंग एजन्सी नेमली होती. याच एजन्सीच्या माध्यमातून अटक करण्यात आलेला आरोपी मोहम्मद शहजादने सैफ अली खानच्या घरात प्रवेश केला होता. त्यावेळेस त्याने सैफच्या घराची पाहणी केली होती. ही बाब त्याच्या चौकशीतून समोर आली आहे. आरोपी शहजादबाबत मुंबई गुन्हे शाखेने असेही म्हटले आहे की, सैफवरील हल्ल्यानंतर त्याने ३ ते ४ वेळा कपडे बदलले होते. गुन्हा केल्यानंतर आरोपी सतत इकडे तिकडे फिरत होता. तो वांद्रे स्टेशनला गेला. तिथून तो दादर, वरळी, अंधेरी आणि नंतर ठाणे येथे गेला. गुन्हे शाखेच्या म्हणण्यांनुसार आरोपी शहजाद गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात मुंबईत आला होता.
चौकशीदरम्यान, हे देखील उघड झाले की आरोपी मोहम्मद शहजादने सैफ अली खानच्या घरात प्रवेश करण्यापूर्वी अनेक सेलिब्रिटींच्या घरांची रेकी केली होती. आरोपी रिक्षाचालकाकडून सेलिब्रिटींच्या घरांची माहिती घेत असे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी रिक्षाचालकाकडून वांद्रे परिसरात राहणाऱ्या सेलिब्रिटींच्या घरांची माहिती मिळवली होती. शाहरुख खान आणि सैफ अली व्यतिरिक्त, आरोपींनी इतर अनेक सेलिब्रिटींच्या घरांचीही रेकी केली होती. रविवारी सकाळी ठाणे शहरातून पोलिसांनी आरोपी शहजाद (३०) याला अटक केली.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी ठाण्यातील कासारवडवली येथील हिरानंदानी इस्टेटजवळ शहजादला अटक करण्यात आली, जे मुंबईतील वांद्रे परिसरातील खानच्या घरापासून सुमारे ३५ किमी अंतरावर आहे. पोलिसांनी शहजादला ठाण्यातील जंगली भागातील एका कामगार छावणीत शोधून काढले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात सात तास चाललेल्या शोध मोहिमेनंतर त्याला अटक करण्यात आली. न्यायालयाने आरोपीला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
आरोपीने पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला आणि म्हणाला, “होय मीच हल्ला केला.” – आरोपीने स्पष्ट केलं की तो चोरीच्याच उद्देशाने सैफच्या घरात गेला होता. पण जेव्हा घरात गोंधळ निर्माण झाला, तेव्हा स्वत:चा बचाव करण्यासाठी त्याने सैफवर हल्ला केला. आरोपी खरं बोलतोय की खोटं हे सिद्ध करण्यासाठी पोलीस त्याला क्राइम सीनवर घेऊन जाऊन सीन रिक्रिएट करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.