(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ सध्या त्याच्या आगामी ‘सरदारजी ३’ चित्रपटावरून वादात सापडला आहे. या चित्रपटात पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरच्या कास्टिंगवरून सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. खुद्द दिलजीतनेही या प्रकरणावर आपले मौन सोडले आहे. याशिवाय, दिलजीतची एक्स मॅनेजर सोनाली सिंगनेही तिचे मत मांडले आहे आणि अभिनेत्याला पाठिंबा दिला आहे आणि सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे, जी वेगाने व्हायरल होत आहे.
या विषयावर दिलजीत काय म्हणाला?
बीबीसी एशियन नेटवर्कशी बोलताना दिलजीत म्हणाला की, ‘जेव्हा हा चित्रपट बनवला गेला तेव्हा सर्व काही ठीक होते. आम्ही फेब्रुवारीमध्ये त्याचे चित्रीकरण केले आणि त्यावेळी परिस्थिती सामान्य होती. त्यानंतर अनेक मोठ्या गोष्टी घडल्या ज्या आमच्या नियंत्रणात नव्हत्या. म्हणून निर्मात्यांनी निर्णय घेतला की आता हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार नाही, म्हणून तो परदेशात प्रदर्शित केला जाणार आहे. निर्मात्यांनी या चित्रपटात खूप पैसे गुंतवले आहेत आणि जेव्हा हा चित्रपट बनवला जात होता तेव्हा असे कोणतेही वातावरण नव्हते.’ असे अभिनेत्याने म्हटले आहे.
काजोलच्या ‘Maa’ चित्रपटाला सेन्सॉरकडून मिळाला हिरवा सिग्नल, कोणत्याही कटशिवाय होणार प्रदर्शित
दिलजीत म्हणाला, ‘मी जेव्हा चित्रपटावर स्वाक्षरी केली तेव्हा सर्व काही ठीक होते. सध्याची परिस्थिती आमच्या हातात नाही. त्यामुळे जर निर्मात्यांना तो परदेशात प्रदर्शित करायचा असेल तर मी त्यांना पूर्ण पाठिंबा देतो.’ असे अभिनेत्याने सांगितले आहे.
सोनाली सिंगने शेअर केली पोस्ट
दिलजीत व्यतिरिक्त, त्याची एक्स मॅनेजर सोनाली सिंगने या वादाला ‘चुकीचे आणि दुर्दैवी’ म्हटले आहे. तिने सांगितले की दिलजीतने नेहमीच त्याच्या कलेच्या माध्यमातून प्रेम आणि बंधुत्वाला प्रोत्साहन दिले आहे. सोनालीच्या मते, चित्रपटाचे चित्रीकरण अशा वेळी पूर्ण झाले जेव्हा भारत-पाकिस्तान संबंध खूप तणाव पूर्ण आहे. यासोबतच, तिने असेही म्हटले की हा चित्रपट कमी बजेटमध्ये बनवला गेला आहे आणि त्याचे नुकसान थेट चित्रपटाच्या कलाकारांचे आणि निर्मात्यांचे होण्याची शक्यता आहे.’
‘दिलजीतने देशाच्या निर्णयाला प्राधान्य दिले’
या वादानंतर, दिलजीत दोसांझने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आणि भारतात चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला. सोनालीने या पावलाचे कौतुक केले आणि म्हटले की दिलजीतने आपले वैयक्तिक आणि आर्थिक नुकसान बाजूला ठेवून देशाच्या भावनांचा आदर केला आहे. आणि हा चित्रपट आता परदेशात प्रदर्शित करण्याचे ठरवले आहे.
चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख
अमर हुंडल दिग्दर्शित ‘सरदारजी ३’ आता भारतात प्रदर्शित होणार नाही. २७ जून रोजी तो फक्त आंतरराष्ट्रीय चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा संपूर्ण वाद सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे आणि दिलजीत दोसांझच्या निर्णयाबाबत दोन मते समोर येत आहेत. एक गट कलाकाराच्या बाजूने उभा आहे, तर दुसरा गट राष्ट्रीय भावनांशी जोडत आहे.