(फोटो सौजन्य - x अकाउंट)
सोनू सूद नेहमीच लोकांना मदत करण्यासाठी उभा असतो. त्याने त्याच्या आयुष्यात चांगली काम करून चाहत्यांचे मन नेहमीच जिंकले आहे. त्यांनी त्यांच्या अभिनयापेक्षा सामाजिक कार्याद्वारे लोकांवर अधिक प्रभाव पाडला आहे. कोरोना काळात, अभिनेत्याने देशभरातील लोकांना मदत केली होती. तेव्हा पासून अभिनेता चाहत्यांचा हिरो आहे. तसेच अभिनेत्याबद्दल एक खास बातमी समोर आली आहे. जी जाणून घेतल्यानंतर चाहत्यांना नक्कीच खूप आनंद होणार आहे. तसेच ही बातमी काय आहे जाणून घेऊयात.
यावर्षी हैदराबादमध्ये होणाऱ्या मिस वर्ल्डच्या ग्रँड फिनालेमध्ये सोनू सूद जज म्हणून प्रेक्षकांना दिसणार आहे. मिस वर्ल्डचा अंतिम सामना ३१ मे २०२५ रोजी हायटेक सिटी हैदराबाद येथे होणार आहे आणि या कार्यक्रमात, अभिनेत्याला त्यांच्या मानवतावादी कार्यासाठी प्रतिष्ठित मानवतावादी पुरस्कार देण्यात येणार आहे. सोनू सूदला HITEX अरेना येथे या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. या बातमीने आता अभिनेत्याचे चाहते चांगलेच आनंदी झाले आहेत.
कोरोना काळात, सोनू सूदने त्याच्या सूद चॅरिटी फाउंडेशनच्या माध्यमातून देशभरातील लोकांना मदत केली आणि आजही तो सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांशी जोडलेला आहे. या अभिनेत्याने त्याच्या धर्मादाय संस्थेद्वारे लाखो लोकांच्या जीवनावर प्रभाव पाडला आहे. कोरोना काळात त्यांनी लोकांना आरोग्य मदत, शिक्षण आणि दिलासा दिला आहे.
मानवतावादी पुरस्कार म्हणजे काय?
मानवतावादी पुरस्कार हा समाजात अतुलनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना दिला जाणारा एक अत्यंत प्रतिष्ठित सन्मान आहे. कोरोना काळात सोनू सूदने केलेल्या मदतकार्याचे केवळ देशानेच नव्हे तर संपूर्ण जगाने कौतुक केले. आता हा अभिनेता आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर हा पुरस्कार स्वीकारणार आहे, त्यानंतर त्याच्या चाहत्यांच्या त्याला पाहून खूपच आनंद होणार आहे.
अभिनेत्याने आनंद व्यक्त केला
पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सोनू सूदने आनंद व्यक्त केला आहे. मिस वर्ल्डचे अधिकृत मीडिया पार्टनर अल्टेअर मीडियाने जारी केलेल्या निवेदनात अभिनेत्याने म्हटले आहे की, ‘मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनकडून मानवतावादी पुरस्कार मिळणे हा एक अतिशय नम्र अनुभव आहे. हे आमच्या प्रयत्नांमागील उद्देशाला बळकटी देते – गरजूंना आशा, आधार आणि सन्मान प्रदान करणे. मी ही ओळख प्रत्येक स्वयंसेवक, समर्थक आणि सूद चॅरिटी फाउंडेशनच्या माध्यमातून ज्यांच्या आयुष्याला स्पर्श केला आहे अशा प्रत्येकासोबत शेअर करत आहे. मला हे जाहीर करताना अभिमान वाटतो की मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशन आणि सूद चॅरिटी फाउंडेशनने कॅन्सर मुक्त जगासाठी जागरूकता पसरवण्यासाठी एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सामायिक वचनबद्धता संदेश वाढविण्यास आणि जगभरातील लाखो लोकांना आशा देण्यास मदत करेल’ असे अभिनेत्याने म्हटले आहे.