(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम )
बॉलिवूड चित्रपट ‘झुंड’मधील अभिनेता प्रियांशू क्षत्रिय उर्फ बाबू छत्रीची मंगळवारी रात्री (७ ऑक्टोबर) निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. प्रियांशू गंभीर जखमी अवस्थेत पोलिसांना आढळून आला आणि तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आला, पण उपचारादरम्यान त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या धक्कादायक घटनेने नागपूर शहर हादरले असून, पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
भोजपुरी अभिनेता पवन सिंहला वाय-प्लस सुरक्षा… नेमकं कारण काय?
पोलिसांच्या माहितीनुसार, छत्रीच्या एका मित्राने त्याच्या गळ्यावर धारदार चाकूने वार केला आणि त्याला रक्तबंबाळ अवस्थेत सोडले. त्यानंतर त्याच्यावर दगडाने ठेचून त्याचा चेहरा विद्रूप केला.ही खूनाची घटना नागपूरच्या जरिपटका पोलिस हद्दीतील नारा जवळ एका पडक्या, निर्जन घरात मध्यरात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास घडली. गजानन नगरातील एका निर्माणाधीन इमारतीजवळील या घरात बाबू छत्री आणि त्याचे नशेडी मित्र दारू, गांजा आणि व्हाईटनरची नशा करत बसायचे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. तिथे प्रियांशू त्यांना अर्धनग्न अवस्थेत आढळला होता. तारेच्या साहाय्याने बांधून त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. त्याच्या शरीरावर चाकूने मारल्याच्या खुणाही आढळल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून लालबहादुर साहू या संशयीताला अटक करण्यात आली आहे.
प्रियांशू क्षत्रियने नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ चित्रपटात बाबू नावाची छोटी पण लक्षवेधी भूमिका साकारली होती, ज्यामुळे त्याला मोठी प्रसिद्धी मिळाली होती. नंतर त्याला चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. त्याच्यावर तब्बल ५ लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीचा आरोप होता. याशिवाय, त्याच्याविरुद्ध इतर अनेक गुन्हेही दाखल झाले होते