एक-दोन नव्हे तर तीन पिढ्यांना हसवणाऱ्या असरानी यांचे निधन
‘हम अंग्रेजों के जमाने का जेलर’ म्हणत प्रेक्षकांना खळखळून हसवणारे अभिनेते गोवर्धन असरानी यांचे आज म्हणजेच 20 ऑक्टोबर रोजी वयाच्या 84 वर्षी निधन झाले आहे. त्यांनी आपल्या उत्तम अभिनयाच्या जोरावर नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन केले. हिंदी सिनेसृष्टीत त्यांचा अस्सल आणि बहुआयामी कलाकार म्हणून त्यांचा विशेष उल्लेखनीय ठसा राहिला. असरानी यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये विनोदी तसेच गंभीर भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या काही भूमिका आजही अजरामर असून प्रेक्षकांच्या आठवणीत कायम राहिल्यात. त्यांचा अचानक जाण्याने सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
”तुम्ही किती पैसे घेता?”…‘KBC 17’ च्या दिवाळी स्पेशलमध्ये कृष्णाच्या प्रश्नावर बिग बी काय म्हणाले?
असरानी यांचा चित्रपटसृष्टीतील प्रवास तब्बल पाच दशकांहून अधिक काळाचा होता. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 350 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. शोले, चुपके चुपके, अभिमान, अंदाज अपना अपना, हम, हेरा फेरी आणि मालामाल वीकली यांसारख्या सुपरहिट चित्रपटांत त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून बसल्या आहेत. शोले चित्रपटातील जेलरच्या भूमिकेतला त्यांचा संवाद, “हम अंग्रेजों के ज़माने के जेलर हैं” आजही लोकांच्या लक्षात आहे.
बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी त्यांच्या निधनावर सोशल मीडियावर तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, परेश रावल आणि जॉनी लीव्हर यांनी असरानी यांना श्रद्धांजली अर्पण करत लिहिले की, “असरानी हे फक्त एक अभिनेता नव्हते, तर ते अभिनयाची एक संस्था होते.”
राजस्थानमधील जयपूर येथे जन्मलेले असरानी यांनी 1960 च्या दशकात चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) मधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मुंबईत अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांचे सुरुवातीचे दिवस संघर्षमय होते, परंतु त्यांच्या नॅचरल कॉमेडी आणि अप्रतिम टायमिंगमुळे ते लवकरच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवू लागले.
चित्रपटांव्यतिरिक्त, असरानी यांनी अनेक टीव्ही शोमध्येही काम केले. वय वाढल्यावरही ते नेहमी चित्रपटसृष्टीत सक्रिय राहिले आणि त्यांच्या खास विनोदी अंदाजाने लोकांना हसवत राहिले. परंतु आता त्यांच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. दिवाळीच्या सणाच्या काळात असरानींच्या निधनाची बातमी मिळाल्याने लाखो चाहत्यांच्या मनावर धक्का बसला आहे.