प्रसिद्ध गायिका उषा उत्थुप यांच्या पतीचे निधन
कोलकाता : पद्मभूषण पूरस्काराने सन्मानित पॉप गायिकी उषा उत्थुप यांचे पती जानी चाको उत्थुप यांचे निधन झाले आहे. सोमवार दि. 8 जुलै ला कोलकाता येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगण्यात येत आहे. उषा उत्थुप आणि त्यांच्या मुलांवर दुख:चा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबासह संगीत आणि चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. इंडस्ट्रीतील अनेकांनी उषाजींना धीर दिला आहे.
रिपोर्ट्सनुसार, जानी चाको उत्थुप कोलकाता येथील त्याच्या घरी टीव्ही पाहत होते. अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांची प्रकृती ढासळत असल्याचे पाहून त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. कार्डिॲक अरेस्टच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. जानी चाको 78 वर्षांचे होते.
आज, मंगळवारी म्हणजेच आज ९ जुलै रोजी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. जानी चाको उत्थुप हे उषाजींचे दुसरे पति होते. त्यांची स्वत:ची चहाची बागायत शेती होती. उषा आणि जानी उत्थुप यांना अंजली व सनी ही दोन मुलं आहेत.
कार्डिॲक अरेस्ट म्हणजे काय?
कार्डिॲक अरेस्ट म्हणजे हृदयाची क्रिया अचानक बंद पडते. यामध्ये रक्तदाब कमी होतो, तसेच मेंदूसह सर्व अवयवांच्या रक्तपुरवठ्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे मेंदुला पुरवठा न झाल्यास कार्डियक अरेस्टचा झटका येतो. त्वरीत उपचार न झाल्यास मृत्यूचा धोका निर्माण होतो.