फोटो सौजन्य - Social Media
लीड ऍक्टर म्हणून ‘रोमियो S3’ अनुपचा पहिला हिंदी सिनेमा आहे.
‘रोमियो S3’मधल्या तुमच्या भूमिकेनं तुम्हाला कशामुळे आकर्षित केले?
संग्राम सिंग शेखावत हे पात्र खूप वेगळं आहे. त्याच्या व्यक्तिमत्त्वात अनेक थर आहेत, आणि मला नेमकं हेच भावलं. पहिल्यांदाच मी हिंदी सिनेमात लीड रोल करतोय, तोही लॉन्च प्रोजेक्ट आहे, त्यामुळे जबाबदारी मोठीच होती.
गुड्डू धनोआ यांच्यासोबत पहिल्यांदा काम करताना अनुभव कसा होता?
गुड्डू सरांसोबत काम करणं म्हणजे एक मोठी संधी होती. ते खूप अनुभवी आहेत आणि प्रत्येक सीनकडे बारकाईनं पाहतात. त्यांनी मला सतत मार्गदर्शन केलं, आणि त्यांच्यासोबत काम करणं म्हणजे एक मजेशीर शिकवण होती.
ही भूमिका करणे आव्हानात्मक वाटलं का?
हो, कारण या पात्रासाठी विशिष्ट शरीरयष्टी लागते. त्यामुळे फिटनेस, डाएट याकडे खूप लक्ष द्यावं लागलं. शिवाय शुटिंगच्या आधी माझं अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं होतं, त्यामुळे शारीरिकदृष्ट्या खूप कष्ट करावे लागले.
तुम्ही हिंदी आणि साउथ दोन्ही इंडस्ट्रीमध्ये काम करता, अभिनयशैलीत काही फरक ठेवावा लागतो का?
मी वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत. या चित्रपटातली भूमिका जणू त्या सगळ्यांचं मिश्रणच आहे. आधीचं माझं काम लोकांना आवडलं असेल तर ही भूमिका त्यांना नक्कीच भावेल.
पात्राची स्टाइल आणि वागणं वेगळी दिसते, त्यासाठी किती तयारी केली?
या चित्रपटात मी दोन वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. एक ड्रग्ज तस्कर आणि एक पोलिस ऑफिसर. त्यामुळे दोघांच्या देहबोलीत, संवादफेकीत फरक असावा म्हणून खूप प्रॅक्टिस केली. त्याचा परिणाम मोठ्या पडद्यावर दिसेलच.
चित्रपटात बरीच अॅक्शन आहे, तुम्ही स्वतः स्टंट्स केले आहेत का?
हो, सगळी अॅक्शन मी स्वतः केली आहे. एकही बॉडी डबल घेतला नाही. टिनू वर्मा यांनी सीन डिझाइन केलेत. ते जबरदस्त अॅक्शन डिरेक्टर आहेत. या स्टंट्समध्ये फक्त मारामारी नाही, तर भावनाही गुंतलेल्या आहेत.
]प्रेक्षकांसाठी काही खास संदेश आहे का?
मला वाटतं की लोकांनी आपल्या पोलिस यंत्रणेचा आणि न्यायव्यवस्थेचा आदर केला पाहिजे. चित्रपटात हीच भावना दाखवली आहे. मला आशा आहे की प्रेक्षक थिएटरमध्ये येऊन आमचं काम बघतील आणि प्रेम देतील.
पलक तिवारीसोबत ऑन-स्क्रीन केमिस्ट्री कशी होती?
पलकसोबत काम करणं म्हणजे धमाल! ती खूप एनर्जेटिक आहे, आणि खऱ्या आयुष्यातसुद्धा तिचं व्यक्तिमत्त्व तसंच आहे. तिने खूप मेहनत घेतली, आणि आमचं ऑन-स्क्रीन बॉण्डिंग छान जुळून आलं आहे.