bheed
राजकुमार राव (Rajkumar Rao) आणि भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘भीड’ चित्रपटाचा ट्रेलर (Bheed Trailer) नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटात दिया मिर्जा (Dia Mirza), आशुतोष राणा (Ashutosh Rana), पंकज कपूर, विरेंद्र सक्सेना, कृतिका कामरा, आदित्य श्रीवास्तव या कलाकारांचाही समावेश आहे.
चित्रपटाच्या 2 मिनिटं आणि 39 सेकंदाच्या ट्रेलरमध्ये भारतातील लॉकडाऊनमुळे उद्भवलेली परिस्थिती दाखवण्यात आली आहे. ट्रेलरची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लॉकडाऊनच्या घोषणेपासून होते. अनेक सत्य घटनांचा आधार घेत त्या घटना चित्रपटात मांडण्यात आल्या आहेत. सायकलवरून आपल्या वडिलांना घरी नेणारी मुलगी, तब्लिगी जमात आणि कोरोना जिहादचा अँगलही या चित्रपटात दिसतो.
या ट्रेलरमध्ये लॉकडाऊनच्या काळात पलायन करावं लागलेले मजूर, कामगार, गरीब आणि श्रीमंत यांच्या संघर्षाची झलक दाखवण्यात आली आहे. लॉकडाऊनसारख्या कठीण प्रसंगातही लोक माणुसकी सोडून धर्म आणि जातीच्या नावावर लढताना दिसले. ट्रेलरमध्ये दिसतं की, कशा प्रकारे राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर यांची भूमिका माणुसकीचे पैलू जपणारी आहे. चित्रपटात राजकुमार राव एका पोलीस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत आहे.
‘इंडिया लॉकडाऊन’ नंतर ‘भीड’मध्ये लॉकडाऊनची कथा
‘भीड’ च्या आधी मधुर भांडारकर दिग्दर्शित ‘इंडिया लॉकडाऊन’ सिनेमातून कोरोना काळात भारतात झालेला लॉकडाऊन आणि त्याकाळात घडलेल्या घटनांचे चित्रण दाखवण्यात आलं होतं. या सिनेमात सई ताम्हणकरने एका मोलकरणीची भूमिका साकारली होती तर प्रतीक बब्बर यानं तिच्या नवऱ्याची भूमिका साकारली आहे. या सिनेमात श्वेता बासु प्रसाद, आहाना कुमरा आणि प्रकाश बेलवाडी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. Zee 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट रिलीज करण्यात आला होता. आता भीड चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे, पाहावं लागेल. ‘भीड’ हा हिंदी सिनेमा 24 मार्चला चित्रपटगृहामध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मानवतेसाठीचा लढा मांडणाऱ्या या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. राजकुमार रावच्या या नव्या रोलबद्दल त्याचं कौतुक होत आहे.