‘आई कुठे...’ फेम अभिनेत्रीने दिली कुलाबा किल्ल्याला भेट, पोस्ट शेअर करत व्यक्त केल्या भावना
‘आई कुठे काय करते’ मालिकेने टेलिव्हिजन अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली. मालिकेमध्ये मधुराणीने अरुंधतीचं पात्र साकारलं होतं. मालिकेने मालिकेतल्या सर्वच कलाकारांना स्वत:ची विशेष ओळख दिली, त्याच प्रमाणे अरुंधती या पात्रानेही मधुराणीला विशेष लोकप्रियता दिली. कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणारी मधुराणी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. मधुराणीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
मधुराणीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती समुद्रातून प्रवास करताना दिसत आहे. त्यानंतर तिने एका किल्ल्याला भेट दिली. या व्हिडिओमध्ये किल्ल्यावरील तोफा, मंदिर, विहीर आणि किल्ल्यावरून दिसणारा समुद्र पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीने शेअर केलेला व्हिडिओ कुलाबा किल्ल्यावरील असल्याचा कळतेय.
सासरे असावेत तर असे! ‘कन्यादान’फेम अभिनेत्रीची सासरेबुवांसाठी खास पोस्ट…
शेअर केलेल्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये मधुराणी म्हणते, “अलिबागला एका कार्यक्रमाच्या निमित्ताने गेले होते तेव्हा तिथल्या किनाऱ्यावरच्या ‘कुलाबा किल्ल्याला’भेट दिली आणि अक्षरशः भारावून गेले. किती काय काय आहे तिथे… दगडी भक्कम तटबंदी, त्या काळातल्या तोफा, उजव्या सोंडेच्या गणपतीचं मंदिर, भवानी माता मंदिर, समुद्रात बांधलेल्या ह्या किल्ल्याच्या मधोमध असणारी गोड्या पाण्याची विहीर… मला अजून माहिती हवी होती ह्या किल्ल्याबद्धल पण ती देऊ शकणारा गाईड सुद्धा तिथे नव्हता. खंत वाटली. किती अप्रतिम महत्वाची ऐतिहासिक पर्यटन स्थळं आहेत. आपल्या महाराष्ट्रात पण ह्या कडे का कुणी गांभीर्याने बघत नाहीये? गूगलवर जी माहिती मिळाली ती इथे देतेय. तीस ते पस्तीस किलोमीटर लांबीची अलिबाग तालुक्यातील किनारपट्टी ‘अष्टागर’ या नावाने ओळखली जाते. या अष्टागराचा राजा म्हणजे ‘किल्ले कुलाबा’, अलिबागचा पाणकोट. शिवरायांनी जे जुने किल्ले दुरुस्त करून मजबूत केले त्यापैकी एक ‘किल्ले कुलाबा!’ प्रथम शिवशाहीनंतर पेशवाई आणि सरते शेवटी इंग्रज असे कालखंड ‘किल्ले कुलाब्याने’ पाहिले. इंग्रज ज्यांना ‘समुद्रावरील शिवाजी’ असे संबोधत त्या कान्होजी आंग्रे यांच्या पहिल्या सागरी राजधानीचा मान किल्ले कुलाब्याला मिळाला.” अभिनेत्रीची पोस्ट पाहिल्यानंतर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करीत प्रतिक्रिया दिल्या आहेत.
दिलजीत दोसांझ आणि एपी ढिल्लनच्या वादात बादशाहची उडी; पोस्ट शेअर करत म्हणाला…