
Marathi Naptak : मराठी मनावर गारूड केलेलं ‘गाढवाचं लग्न’ हे वगनाट्य अभिनेते मोहन जोशी (Mohan Joshi) आणि अभिनेत्री सविता मालपेकर (Savita Malpekar) यांच्या अफलातून अदाकारीनं गाजलं. आपल्या अभिनयातून हुकूमत गाजवत प्रेक्षकांचे दिलखुलास मनोरंजन करणाऱ्या या दोन ताकदीच्या कलाकारांची जोडी पुन्हा एकदा रसिकांचं मनोरंजन करायला एकत्र आली आहे. आगामी सुमी आणि आम्ही या नाटकातून ही जोडी पुन्हा रंगभूमीवर एकत्र येणार आहे. चित्रपट, मालिका, नाटक या तिन्ही माध्यमातून आपल्या अभिनयाचा ठसा या दोघांनी उमटवला आहे. विशेष म्हणजे बऱ्याच वर्षांनी हे दोन मात्तबर कलाकार रंगभूमीवर दिसणार आहेत. राजस प्रोडक्शन्स आणि मायबोली चित्र निर्मित ‘सुमी आणि आम्ही’ हे नाटक २२ एप्रिलला रंगभूमीवर येणार आहे. नाटकाचे निर्माते राजस संजय गोडसे, शैलेश राजे आहेत. राजन मोहाडीकर यांनी हे नाटक लिहिले असून पुरुषोत्तम बेर्डे (Purushottam Berde) यांनी दिग्दर्शित केले आहे.
नाटकात मोहन जोशी आनंद धडफळे ही व्यक्तीरेखा साकारणार आहेत. सविता मालपेकर आणि पुरुषोत्तम बेर्डे यांच्यासोबत काम करायला मिळाल्याचा आनंद होत असल्याचं मोहन जोशी यांनी म्हटलंय. विशेष म्हणजे राजन मोहाडीकर यांनी हे नाटक लिहिल्याने एक उत्तम सकस नाटयकृती असणार हे लक्षात घेऊन नाटकास होकार दिल्याचं मोहन जोशी म्हटलंय. जवजवळ १२ वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर काम करणाऱ्या सविता मालपेकर म्हणाल्या, आजवरच्या भूमिकांपेक्षा वेगळया बाजाची भूमिका आणि त्यात पुन्हा पुरुषोत्तम बेर्डे आणि मोहन जोशी या आवडत्या मंडळीसोबत काम करण्याची संधी मिळत असताना ती सोडणं कदापी शक्य नाही. मेधा धडफळे ही माझी व्यक्तीरेखा आहे.
अभिनयातील परिपक्वता, सहजता यांचा सुरेख मिलाफ या दोघांच्या अभिनयातून पाहायला मिळतो. रंगभूमीवर बऱ्याच वर्षांनी काम करण्याचा आनंद व्यक्त करताना एका चांगल्या टीमसोबाबत काम केल्याचं समाधान देणारं हे नाटक प्रेक्षकांना ही अंतर्मुख करेल असा विश्वास हे दोघे व्यक्त करतात.
सुमी आणि आम्ही फॅमिली ड्रामा असलेलं दोन अंकी नाटक आहे. तरुण मुलगी गाठू पाहणारं एक वेगळंच ध्येय आणि त्यावेळचे तिचे आई- वडिलांशी संबंध असं खेळकर कुटुंब या नाटकातून पाहायला मिळेल. या नाटकात मोहन जोशी, सविता मालपेकर या दोघांसोबत श्रद्धा पोखरणकर, उदय लागू, राजेश चिटणीस, प्रदीप जोशी, चंद्रशेखर भागवत यांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्रकाशयोजना शीतल तळपदे यांची असून सूत्रधार सुनील महाजन, संदीप विचारे आहेत.