
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
मराठी मनोरंजन विश्वातून राजकारणात प्रवेश करणाऱ्या कलाकारांच्या यादीत आता अभिनेत्री निशा परुळेकर हिचं नावही सामील झालं आहे. सध्या मुंबई आणि उपनगरासह संपूर्ण राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. 15 जानेवारी 2026 रोजी मुंबईत महापालिका निवडणुका पार पडणार आहेत. तर 16 जानेवारीला निवडणुकांचा निकाल जाहिर होणार आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेवर सत्ता कोणाची हे थोड्याच दिवसांत स्पष्ट होईल. भाजप मुंबईत सत्ता मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत. भाजपाकडून काही उमेदवारांना निवडणुकीचा एबी फॉर्म देण्यात आला आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत निशा परुळेकर भारतीय जनता पार्टीकडून (भाजपा) उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपाने त्यांना अधिकृतपणे तिकीट दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अभिनेत्री निशा परूळेकरने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपाने कांदिवली पूर्व प्रभाग क्रमांक 25 साठी तिला उमेदवारी दिली आहे. निशा परूळेकरच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे योगेश भोईर- माधुरी भोईर उमेदवार आहेत.
अभिनेत्री निशा गेल्या काही काळापासून राजकारणात सक्रिय असून सध्या ती भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठच्या सहसंयोजक म्हणून कार्यरत आहे.मराठी चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांमधून निशा परुळेकरने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनयासोबतच सामाजिक उपक्रमांमध्येही तिचा सक्रिय सहभाग राहिला आहे. त्यामुळेच पक्षाने तिच्यावर विश्वास दाखवत तिला महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दिल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, मुंबई महापालिका निवडणूक जवळ येत असताना भाजपाकडून नव्या आणि ओळखीच्या चेहऱ्यांना संधी दिली जात असल्याचं चित्र दिसत आहे. निशा परुळेकरच्या उमेदवारीमुळे मतदारांमध्ये कितपत प्रभाव पडतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
कोण आहे निशा परूळेकर?
निशा परुळेकर हे मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील एक महत्वाचे नाव आहे. तिने अनेक नाटक, मालिकां आणि सिनेमांमध्ये काम केले आहे. तिच्या चर्चित चित्रपटांमध्ये ‘काळुबाई पावली नवसाला’, ‘अशी होती संत सखू’, ‘सासूच्या घरात जावयाची वरात’, ‘पोलीस लाईन’, ‘हरी ओम विठ्ठला’ आणि ‘तीन बायका फजिती ऐका’ यांचा समावेश होतो.तिने रंगभूमीवरही आपली छाप सोडली आहे; ‘सही रे सही’ या नाटकात तिने भरत जाधव यांच्यासोबत काम केले. निशा परुळेकरची बहुमुखी प्रतिभा आणि अभिनय कौशल्यामुळे ती मराठी कलाविश्वातील एक ओळखलेले आणि लोकप्रिय कलाकार बनली आहे.