(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
महाराष्ट्राचा लाडका गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. आपल्या सर्वांना परिचित असलेल गणपती बाप्पाचं “डम डम डम डम डमरू वाजे….” हे गाजलेलं गाणं “नवरा माझा नवसाचा 2” या चित्रपटात नव्या ढंगात आपल्या भेटीला येणार असून, सचिन पिळगावंकर आणि आदर्श शिंदे यांनी हे गाणं पहिल्यांदाच एकत्रित गायले आहे.
सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेची निर्मिती असलेल्या “नवरा माझा नवसाचा 2” या चित्रपटाची निर्मिती, कथा – पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केले असून संवाद संतोष पवार यांचे आहेत. अभिनेते सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, निर्मिती सावंत, वैभव मांगले आणि सिद्धार्थ जाधव अशी दमदार स्टारकास्ट आपल्याला या चित्रपटामधून पाहायला मिळणार आहेत. “डम डम डम डम डमरू वाजे….” या रिक्रिएट केलेल्या गाण्याचं गीतलेखन प्रवीण दवणे यांनी केले असून संगीत दिग्दर्शन रविराज कोलथरकर या नवोदित संगीत दिग्दर्शकाने केले आहे.
या गाण्याबद्दल सांगताना अभिनेता सचिन पिळगावंकर म्हणाले, “देवा तुझ्या गाभाऱ्याला….” या गाण्यापासूनच मी आदर्श शिंदेच्या आवाजाचा मी फॅन झालो होतो. मी त्याला माझ्या मुलासारखा मानू लागण्याइतके आम्ही दोघे एकमेकांच्या जवळ येऊ असे मला वाटले देखील नव्हते. त्याच्याबरोबर कधी एकत्र गाता येईल याची देखील कल्पना नव्हती. आदर्शने अत्यंत आपुलकीने हे गाणं माझ्याबरोबर गायलं आहे. या गाण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली आहे, त्याला हवं त्या पद्धतीनं या गाण्यावर काम केलं आहे. त्यामुळे हे गाणं नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीला उतरेल. रविराज कोलथरकर या तरुण संगीतकाराचं “नवरा माझा नवसाचा 2” या चित्रपटातून पदार्पण होत आहे. अतिशय गुणी असा हा कलाकार आहे, अशी भावना सचिन पिळगावंकर यांनी व्यक्त केली.
गाण्याविषयी आदर्श शिंदे म्हणाला, की “डम डम डम डम डमरू वाजे….” हे गाणं मी लहानपणापासून ऐकत, गात आलो आहे. आता “नवरा माझा नवसाचा 2″ या चित्रपटात सचिन पिळगावंकर यांच्यासह ते मला गायला मिळणं ही खूप आनंदाची बाब आहे. आम्ही दोघांनी एकाचवेळी एकत्र उभे राहून हे गाणं गाण्याचा वेगळा प्रयोग केला. त्यामुळे पूर्वीच्या काळी जसं रेकॉर्डिंग व्हायचं तसं हे गाणं केलं आहे. तो अनुभव खूप कमाल होता. यंदाच्या गणेशोत्सवात हे गाणे नक्कीच गाजेल अशी मला आशा आहे.” असं गायक आदर्श शिंदे म्हणाला.
हे देखील वाचा- ‘ताल’ चित्रपटाला २५ वर्ष पूर्ण; अनिल कपूरने शेअर केल्या आठवणी, अजूनही गाणी आहेत हिट!
दरवर्षी गणेशोत्सवानिमित्त गणपती बाप्पावरची अनेक गाणी येत असतात. मात्र यंदाचा गणेशोत्सव “डम डम डम डम डमरू वाजे….” या गाण्यामुळे अधिकच स्पेशल होणार आहे, प्रत्येक घरात, मंडळात हे गाणं वाजेल यात शंका नाही. “नवरा माझा नवसाचा 2” हा चित्रपट २० सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा अनुभव प्रेक्षकांना चित्रपगृहात घेता येणार आहे.