
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
स्टार प्रवाहच्या मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद सीजन 4 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोच्या च्या तिन्ही पर्वांना प्रेक्षकांनी भरभरुन दिले. या तिन्ही पर्वातले स्पर्धक आपल्या टॅलेण्टने महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करत आहेत. मालिकेचं शीर्षकगीत असो वा सिनेमातलं गाणं प्रत्येक स्पर्धकाला स्टार प्रवाहच्या माध्यमातून आपली चमक दाखवण्याची संधी मिळाली आहे. मी होणार सुपरस्टारचा मंच ही केवळ स्पर्धा नसून स्पर्धकांच्या कलागुणांना वाव देणारा हक्काचा मंच आहे. स्पर्धकांवर सुरांचे संस्कार करण्यासाठी मी होणार सुपरस्टारचा चौथा सीजन सज्ज आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले छोटे उस्ताद आपल्या सुरांनी संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणार आहेत. मराठी अभिनेत्री ऋजुता देशमुख हिची लेक म्हणजेच अभिनेत्री साजिरी जोशी या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडणार आहे. साजिरी नुकतीच एका सिनेमा आणि वेबसीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या गुणी अभिनेत्रीच्या अभिनयाचं सध्या सगळीकडेच कौतुक होत आहे. हाच गोडवा घेऊन ती छोट्या उस्तादांसोबत धमाल करणार आहे.
मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ४ च्या निमित्ताने साजिरी टीव्हीविश्वात पदार्पण करत आहे. याविषयी सांगताना साजिरी म्हणाली, ‘खूप उत्सुक आहे नवीन माध्यम जाणून घेण्यासाठी. मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद हा कमाल शो आहे. याआधीची तिन्ही पर्व सुपरहिट ठरली आहेत. चौथं पर्व मला होस्ट करायला मिळणं ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. सगळेच स्पर्धक कमाल आहेत. त्यांची गाणी ऐकण्यासाठी, त्यांचं स्वप्न जाणून घेण्यासाठी मी उत्सुक आहे. सचिन पिळगावकर सर, आदर्श शिंदे दादा, वैशाली सामंत ताई इतके दिग्गज समोर असताना मलाही खूप गोष्टी शिकायला मिळणार आहेत. सुरांची स्वप्ननगरी अशी या पर्वाची थीम असणार आहे. स्वप्न सगळ्यांसाठीच महत्त्वाची असतात. जादू अनुभवायला प्रत्येकालाच आवडतं. त्य़ामुळे या जादुई नगरीची सफर करण्याची एक वेगळी ओढ लागलीय. तेव्हा पाहायला विसरु नका मी होणार सुपरस्टारचा चौथा सीझन ३ जानेवारी पासून सुरू होणार आहे.