
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
प्रसिद्ध नाटककार गंगाराम गवाणकर यांचे 86 व्या वर्षी निधन झाले असून मराठी रंगभूमीला मोठा धक्का बसला आहे. त्यांनी सोमवारी दहिसर येथील खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.मागील काही महिन्यांपासून गंगाराम गवाणकर यांची तब्येत खालावलेली होती. अखेर वयोमानानुसार आलेल्या आजाराशी झुंज देत त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने मराठी रंगभूमीवर एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. आज दहिसर येथील अंबावाडी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
गवाणकर हे कोकणाचे सुपुत्र आणि मराठी रंगभूमीवरील एक महत्वाचे नाव होते. त्यांनी ‘वस्त्रहरण’, ‘दोघी’, ‘वनरूम किचन’, ‘वरपरीक्षा’, ‘वर भेटू नका’ अशा अनेक लोकप्रिय नाटके लिहिली. त्यांच्या लेखणीतून ग्रामीण बोलींना आणि विशेषतः मालवणी भाषेला नवी ओळख मिळाली.
आपल्या कारकिर्दीची सुरुवात गवाणकर यांनी 1971 साली केली. एमटीएनएलमध्ये नोकरी करत असतानाच त्यांनी नाट्यलेखनाचा छंद जोपासला. त्यांच्या अनेक नाटकांनी मराठी रंगभूमीला नवा आत्मा दिला. त्यांनी 96व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद भूषवले होते, ही त्यांच्यासाठी मोठी गौरवाची बाब ठरली.
‘वस्त्रहरण’ या त्यांच्या नाटकाने महाराष्ट्रात प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. त्यांच्या लेखणीतली विनोदपूर्ण शैली, वास्तव आणि संवादांची माया प्रेक्षकांना भुरळ घालणारी होती. प्रसिद्ध लेखक पु. ल. देशपांडे यांनीही या नाटकाची विशेष प्रशंसा केली होती.मराठी रंगभूमीने आज एक प्रतिभावान, प्रांजळ आणि मातीशी जोडलेला नाटककार गमावला आहे.