the kerala story
गेल्या आठवड्यात रिलीज झालेल्या ‘द केरळ स्टोरी’(The Kerala Story) वरून बराच वाद सुरु आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि हरियाणा या भाजपशासित राज्यांमध्ये ‘द केरळ स्टोरी’ टॅक्स फ्री करण्यात आला आहे. तर पश्चिम बंगाल आणि कर्नाटकमध्ये या च्या स्क्रिनिंगवर बंदी आहे. या चित्रपटाविषयी मीडियामध्ये (Media) विशेषत: मुस्लीम देशांमधील मीडियामध्ये याविषयी खूप चर्चा सुरु आहे. सगळ्यात आधी या चित्रपटाच्या कथेत असं काय आहे ज्यामुळे इतका वाद होतोय ते जाणून घेऊयात.
‘द केरळ स्टोरी ’ चित्रपटामध्ये गायब होणाऱ्या मुलींचं धर्म परिवर्तन करून त्यांना इस्लामिक राज्यांमध्ये (Islamic Country) सामावून घेण्याविषयी भाष्य करण्यात आलं आहे. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर याच्याविषयी वाद सुरु झाला.
ट्रेलरमधून दिसतं की हा चित्रपट हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांना इस्लाम धर्म स्वीकारायला लावण्याविषयी आणि नंतर ISIS मध्ये जबरदस्ती सामील करण्याची कहाणी आहे. यात दावा करण्यात आला आहे की, केरळच्या 32000 हिंदू मुलींना फूस लावून ISIS मध्ये काम करण्यासाठी भाग पाडण्यात आलं. पण केरळ कोर्टाच्या हस्तक्षेपानंतर 32000हा आकडा हटून तीन मुलींची खरी कहाणी असं ट्रेलरमध्ये नमूद करण्यात आलं. या चित्रपटाविषयी मुस्लीम देशांमध्ये खूप चर्चा आहे.
पाकिस्तान
पाकिस्तानचे वृत्तपत्र डॉनमध्ये या चित्रपटाला पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या विरोधाबद्दल लिहिलं आहे.पश्चिम बंगाल सरकारने मुसलमानांविषयी द्वेष निर्माण करण्याचा आणि प्रोपोगंडा पसरवण्याचा आरोप या चित्रपटावर केला आणि या चित्रपटावर पश्चिम बंगालमध्ये बंदी घातली. दक्षिणपंथी सत्तारूढ युतीने याचा विरोध केला.
डॉनमध्ये पुढे लिहिलं आहे की,‘द केरळ स्टोरी’ मध्ये दावा करण्यात आला आहे की 32,000 हिंदू आणि ख्रिश्चन महिलांनी मुस्लिम धर्माचा स्वीकार केला आणि दहशतवादी संघटनेत त्यांना पाठवण्यात आलं. धार्मिक तेढ वाढवण्याचा, अशांती पसरवण्याचा हा प्रयत्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र या चित्रपटाला पाठिंबा देत आहेत.
पाकिस्तानातील द एक्सप्रेस ट्रिब्यूनने ‘द केरळ स्टोरी’ म्हणजे ‘द काश्मीर फाइल्सनंतर मुसलमानांना टार्गेट करणारी आणखी एक भारतीय फिल्म आहे.
कतार
कतारमधील अलजजीराने चित्रपटात निर्मात्यांनी आपले दावे सिद्ध करण्यासाठी लव्ह जिहादचा विषय त्यात वापरला आहे.भाजपला केरळमध्ये सत्ता मिळवता आलेली नाही. तिथे काँग्रेसचं राज्य आहे. त्यामुळे भाजप या चित्रपटाला सपोर्ट करत आहे. मोदी सत्तेवर आल्यावर सिनेमामध्ये वेगळा धार्मिक विषय मांडण्याचा ट्रेंड आला आहे. हा चित्रपट त्याचाच एक भाग आहे.
संयुक्त अरब अमीरात
यूएईच्या खलीज टाइम्स वृत्तपत्राने लिहिलं आहे की, या चित्रपटात खोटे दावे करण्यात आले आहेत. हिंदू मुलींच्या धर्मांतराचा खोटा दावा यात आहे.
ट्रेलरमध्ये दावा करण्यात आला आहे की केरळच्या 32,000 महिला बेपत्ता झाल्या आणि दहशतवादी संघटनेत सामील झाल्या. मात्र ऑब्जर्वर रिसर्च फाउंडेशनच्या 2019 च्या एका रिपोर्टमध्ये लिहिलं आहे की, केरलमधून फक्त 60 ते 70 माणसं 2014 आणि 2018 दरम्यान दहशतवादी संघटनेत सामील झाली.
सौदी अरेबिया
सौदी अरबच्या सौदी गॅजेटने लिहिलं आहे की, हा चित्रपट म्हणजे एक प्रोपोगंडा आहे. भारतातील बीजेपी शासित अनेक राज्यांनी चित्रपट टॅक्स फ्री केला आहे. अनेक लोक चित्रपटावर आरोप करत आहेत की, हा चित्रपट मुसलमानांचं चुकीच्या पद्धतीने चित्रण करतो. तसेच इस्लामोफोबिया वाढवतो.धार्मिक तेढ वाढवणारा हा चित्रपट आहे.