‘पंचायत’ वेबसीरिजने प्रेक्षकांचे दमदार मनोरंजन केले आहे. ही वेबसीरीज ‘ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेली आहे. या सीरिजचे आतापर्यंत तीन सीझन रिलीज झाले असून आता प्रेक्षकांना उत्सुकता आहे, आगामी सीझनची… ‘पंचायत’ सीरिजमधील सचिव अभिषेक त्रिपाठी म्हणजेच अभिनेता जितेंद्र कुमार सध्या चर्चेत आला आहे. मोजक्याच प्रोजेक्टमध्ये काम केलेल्या जितेंद्रने त्याच्या आयुष्यातील स्ट्रगलच्या काळातील दिवसांवर भाष्य केले आहे. ओटीटीच्या माध्यमातून प्रकाशझोतात आलेल्या जितेंद्रने नुकतीच सायरस ब्रोचाला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने आपल्या संघर्षाच्या दिवसांवर भाष्य केले आहे.
मुलाखतीत अभिनेता जितेंद्र कुमारने सांगितले की, “माझा जन्म राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील खैरथल गावात झाला आहे. माझ्या आयुष्यामध्ये मला आणि कुटुंबाला काही महिने जंगलात एका झोपडीत राहावं लागलं होतं. आमच्याकडे एक पक्कं घर होतं आणि एक झोपडी होती. तर त्या घरांमध्ये मी आणि माझी जॉईंट फॅमिली राहायचो. मला आजही आठवतंय. माझे काका आणि वडील सिव्हिल इंजिनिअर आहेत आणि मी सुद्धा सिव्हिल इंजिनियर आहे. आमचे घर होते, त्यामध्ये आणखी दोन खोल्या बांधायच्या होत्या. त्यामुळे आम्हाला सर्वांना सहा ते सात महिने झोपडीत राहावं लागलं होतं.”
मुलाखती दरम्यान जितेंद्रने सांगितलं की, “मला आठवतं, तिथं झोपडीत राहायला खूप विचित्र वाटायचं. पण शेवटी वेळ आहे, म्हणून मी कसं तरी तिकडे राहिलो. अनेकदा मी उन्हाळ्याच्या सुट्टीत मोलमजुरीचे काम करायचो. मी पेंटर किंवा कारपेंटर यांच्याकडे काम करायचो. ते मला दररोज ४० रुपये मजुरी द्यायचे. मी मोलमजुरी करतो, ही गोष्ट माझ्या वडिलांना कळलं तेव्हा ते माझ्यावर फार नाराज झाले होतो. त्यावेळी मी ११ ते १२ वर्षांचा होतो, तेव्हा मी मजुरांना कामात मदत करायचो. मी सुरवातीपासून घरे बांधताना पाहिली असल्यामुळे मला ते काम करायला जमायचं.”
हे देखील वाचा – रामचरणने राहासाठी पाठवलेलं गिफ्ट पाहून आलिया घाबरली, अभिनेत्रीने सांगितला खास किस्सा
जितेंद्र कुमार ‘कोटा फॅक्टरी’ आणि ‘पंचायत’ सारख्या सीरीजमुळे प्रकाशझोतात आला आहे. त्याने ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’, ‘जादुगार’, ‘ड्राय डे’सह इतर चित्रपटांमध्येही काम केलं आहे. जितेंद्र कुमारचा सोशल मीडियावर लाखोंचा चाहतावर्ग आहे, तो कायमच इन्स्टाग्रामवर ॲक्टिव्ह असतो. तो कायमच इन्स्टाग्रामवर जबरदस्त फोटो शेअर करत असतो.