"नसिरुद्दिन शाह यांनी मला बघितलं आणि...", किरण मानेंनी सांगितला नाटकादरम्यान 'तो' किस्सा
आपल्या आवडत्या कलाकाराला भेटण्याची प्रत्येकाला फार इच्छा असते. आपण आपलं स्वप्न कसं पूर्ण करता येईल, याची कायमच वाट पाहत असतो. अगदी सामान्य माणूसच नाही तर सेलिब्रिटी सुद्धा सेलिब्रिटींचे फॅन्स होतात. ‘बिग बॉस मराठी ४’ फेम किरण माने नेहमीच आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या रोकठोक वक्तव्यामुळे त्यांचे इंडस्ट्रीत अनेक चाहते आहेत. पण ते ही कोणत्या तरी सेलिब्रिटीचे फार मोठे फॅन आहेत. अभिनेता किरण माने बॉलिवुड अभिनेता नसीरुद्दीन शाह यांचे मोठे फॅन आहेत. खास आपल्या आवडत्या सेलिब्रिटीसाठी त्यांनी पोस्ट लिहिली आहे.
हे देखील वाचा – रामचरणने राहासाठी पाठवलेलं गिफ्ट पाहून आलिया घाबरली, अभिनेत्रीने सांगितला खास किस्सा
किरण माने नसीरुद्दीन यांचं एक नाटक पाहायला गेले होते. त्या नाटकादरम्यानचा आणि त्यांच्या भेटीदरम्यानचा किस्सा त्यांनी आपल्या पोस्टमधून शेअर केला आहे. “…मी स्वप्नातबी विचार केला नव्हता की कधीतरी द ग्रेट नसिरूद्दीन शाह यांच्या समोरासमोर उभा राहून नाटक आणि अभिनय याविषयी गप्पा मारेन. पण ते घडलं ! पाच सहा वर्षांपुर्वी एन.सी.पी.ए.मध्ये त्यांचं ‘द फादर’ नाटक बघायला गेलो होतो. नाटक आणि त्यांचा अफलातून अभिनय पाहून लै म्हणजे लैच भारावून गेलो होतो. पुर्वी कधीतरी त्यांच्या मुलाखतीत वाचलं होतं की ते नाटकाच्या प्रयोगानंतर कुणाला भेटत नाहीत. एनसीपीएच्या उच्चभ्रू प्रेक्षकांनीही ते वाचलं असावं त्यामुळे भारावलेले सगळेजण नाटक संपल्यावर हळूहळू कुजबुजत घरी निघून चालले होते…”
“मला मात्र रहावेना. म्हन्लं, च्यायला सातारहून आपण हे नाटक बघायला आलोय. या महान अभिनेत्याला आपण भेटलो नाही तर काय अर्थय? धाडस करून घुसलो बॅकस्टेजला. मेकअप रूममधून नसिरभाईंनी मला बघितलं आणि अचानक हसत-हसत माझ्या दिशेला आले. मी सटपटलो. वाटलं जवळ येऊन मुस्काटात मारू नये म्हणजे झालं. मी हात जोडून नमस्कार केला आणि नम्रपणे नाटकाच्या प्रयोगाविषयी बोलायला सुरूवात केली. ते मन लावून ऐकू लागले. मगू माझी भिड जरा चेपली. बोलता-बोलता मी त्यांच्या अभिनयातल्या काही बारकाव्यांवर बोलायचं धाडस केलं… अचानक नसिरभाईंनी नकळत माझा हात हातात घेतला. खूप वेळ तसाच पकडून ठेवला…”
हे देखील वाचा – बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर रितेश देशमुखची पोस्ट, केली न्यायाची मागणी; म्हणाला…
“मला मनापासून असं वाटत होतं, की त्या स्पर्शातनं खूप काही ‘पास’ होऊन माझ्यात यावं !! मी खुप वेळ बोलत राहिलो. त्या दारातनं माझ्या मागोमाग पनवेलच्या एका नाटकाच्या ग्रुपमधली काही पोरं घुसली होती. त्यांच्यातल्या कुणीतरी हे फोटोज काढले. मला बाहेर आल्यावर ती पोरं भेटली. म्हन्ली, “तुम्हाला मेकअपरूमकडं जाताना पाहिलं आणि आम्ही ओळखलं की किरण माने नसिरजींना भेटूनच जाणार. मग आम्हीही मागं आलो.” त्या पोरांमुळं ही आठवण कॅमेर्यात कैद झाली… लब्यू नसिरभाई…”