raj kundra
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) नवरा आणि व्यावसायिक राज कुंद्रा (Raj Kundra) यांच्या आयुष्यावर नवा चित्रपट येतोय. ‘UT 69’ असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. ‘UT 69’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात राज कुंद्राने आपला मास्क उतरवला.गेले काही महिने राज कुंद्रा वेगवेगळे मास्क घालून सगळीकडे फिरत होता. त्याला मास्कवरून आणि पॉर्नोग्राफी प्रकरणात झालेल्या अटकेवरून प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. आज अखेर त्याने तो मास्क उतरवला आणि स्वत:ची बाजू मांडली.
सोशल मीडियावर राज कुंद्राचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या ट्रेलर लाँचदरम्यान राजने आपल्या अनुभवाबद्दल भाष्य केलं आहे. मास्क घालायची वेळ त्याच्यावर का आली आणि त्याच्या कुटुंबाला मीडिया ट्रायलचा नेमका कसा त्रास झाला यावर तो सविस्तर बोलला. “जे काही बोलायचंय ते मला बोला, माझ्या बायकोला, मुलांना, कुटुंबाला यामध्ये आणू नका.” असं सांगताना राज कुंद्रा भावूक झाला.
मीडियाशी संवाद साधताना राज म्हणाला, “ मास्क वापरावा लागणं हीच माझ्यासाठी दुर्दैवी व दुःखद गोष्ट होती. माझ्या कोर्टातील खटल्यापेक्षा मीडियामधून चालवला गेलेला खटला जास्त त्रासदायक होता. याचा दोष मी तुम्हाला देणार नाही. ट्रोलर्स म्हणायचे की हा तोंड दाखवायच्या लायकीचा नाही. याला लिंक पाठवा. मला माहित होतं की मी स्टार नाही. आमच्या घरात एकच स्टार आहे. मी विचार केला की मास्क माझा स्टार आहे. मी पहिल्याच दिवशी मास्क उतरवला असता तर लोकांनी हा चित्रपट बघण्याचा विचार केला नसता. माझा जेव्हा चित्रपट प्रदर्शित होईल तेव्हाच मी हा मास्क काढेन असा निर्धार मी मनाशी केला होता. मला आपल्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे, सत्य लवकरच लोकांसमोर येईल.”
तो पुढे म्हणाला, “ ही संपूर्ण गोष्ट माझ्या कुटुंबासाठी फार वेदनादायक होती. जे बोलायचं आहे ते मला बोला.माझी बायको, मुलं कुटुंबाबद्दल बोलू नका, त्यांनी तुमचं काय बिघडवलं आहे.” असं सांगताना राज कुंद्रा फारच भावुक झाला. राजच्या ‘UT 69’ या आगामी चित्रपटाचं दिग्दर्शन शाहनवाज अली यांनी केलं आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.