लग्न टिकवण्यासाठी शर्मिला टागोर यांनी मुलीला दिलेला मोलाचा सल्ला, सोहा अली खानने सांगितले गुपित...
६०, ७० आणि ८०च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये शर्मिला टागोर यांचं नाव आवर्जुन घेतलं जातं. त्यांनी आपल्या सिनेकरियरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. सर्वोत्तम अभिनेत्री म्हणून कायमच चर्चेत राहणाऱ्या शर्मिला टागोर सध्या त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आल्या आहेत. शर्मिला यांनी त्यांच्या लेकीबद्दल एक महत्वाचे विधान केले आहे. शर्मिला टागोर जेव्हा सिनेसृष्टीमध्ये सक्रिय होत्या, त्यावेळी त्यांना माहित होते की, आपल्या खासगी आणि फिल्मी करियरमध्ये संतुलन कसं ठेवावं. शर्मिला यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात आणि घरात शांतता राखण्यासाठी त्यांना काय करावे लागेल आणि मग जेव्हा वेळ आली तेव्हा त्यांनी त्यांची मुलगी सोहा अली खानलाही हाच सल्ला दिला.
हॉलीवूड रिपोर्टर इंडियाशी बोलताना सोहा अली खानने सांगितले की, तिच्या आईचा असा विश्वास होता की, निरोगी वैवाहिक जीवनासाठी स्त्रीने कायमच पुरुषाच्या अहंकाराची काळजी घेतली पाहिजे. जेव्हा सोहाने अभिनेता कुणाल खेमूसोबत लग्न केले तेव्हा सुद्धा शर्मिला यांनी आपल्या लेकीला हाच सल्ला दिला होता. मुलाखती दरम्यान खुलासा करताना सोहा म्हणाली की, “माझ्या आईने मला सांगितले होते की, महिलांनी नेहमीच पुरुषांच्या अहंकाराची काळजी घेतली पाहिजे आणि पुरुषाने स्त्रीच्या भावनांची काळजी घेतली पाहिजे. जर तुम्ही हे करू शकलात, तर तुमचे नाते दीर्घ आणि यशस्वी होईल. अनेक लोकांना असं वाटतं की, पुरूषांना भावना असतात आणि महिलांना अहंकार असतो. पण आईने दिलेला सल्ला माझ्या खूप कामी आला.”
मुलाखतीदरम्यान सोहा अली खानने पुढे असा खुलासा केला की, “मला असं वाटतं की, दीर्घकालीन नातेसंबंध हे सर्वात आव्हानात्मक गोष्ट आहे आणि तिथे तुम्हाला मित्रांची आवश्यकता आहे. कारण, जर तुम्ही तुमच्या जोडीदारावर सर्व काही लादले, तर तुम्ही नातेसंबंधावर खूप दबाव आणाल…” सोहासोबत नेहा धुपिया सुद्धा मुलाखतीमध्ये सहभागी झाली होती. अभिनेत्रीने सांगितले की, जेव्हा तिने अंगद बेदीसोबत लग्न केले तेव्हा सोहाने तिला सल्लाही दिला होता. नेहा म्हणाली, “सोहाने मला सांगितले की, पुरुषांचा अहंकार खूप नाजूक असतो. म्हणून तुम्ही काय बोलता याकडे लक्ष दिले पाहिजे.” याशिवाय अभिनेत्रीने मुलाखतीत लग्नसंस्थेवरही भाष्य केलेय.