सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याचे निधन, ४०० हून अधिक चित्रपटांत केले होते काम; कुटुंबियांना दु:ख अनावर
तमिळ चित्रपटसृष्टीतून एक अतिशय दुःखद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध तमिळ चित्रपट अभिनेते दिल्ली गणेश यांचे निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून वाढत्या वयानुसार त्यांना आरोग्याच्या तक्रारी जाणवत होत्या. त्यांचे वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले आहे. शनिवारी (०९ नोव्हेंबर) रात्री ११ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. दिल्ली गणेश यांच्या निधनाचे वृत्त ऐकून तामिळ सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, दिल्ली गणेश यांचं शनिवारी (०९ नोव्हेंबर) रोजी रात्री चेन्नईतल्या एका खासगी रुग्णालयात निधन झालं. त्यांच्यावर आज रविवारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
हेदेखील वाचा – सारा अरफीन खानने संतापून अविनाश, ॲलिस आणि ईशाची मागितली माफी!
दिल्ली गणेश यांच्या निधनाने कुटुंबियांसह फिल्म इंडस्ट्रीतील त्यांच्या मित्रांना आणि चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. सहकलाकारांसह इंडस्ट्रीतील दिग्गज व्यक्तिमत्वांनीही दिल्ली गणेश यांच्या निधाचे वृत्त कळल्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. दिल्ली गणेश यांच्या मुलाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत वडिलांच्या निधनाची माहिती चाहत्यांना दिली. दिल्ली गणेश यांच्या मुलाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटलं की, “आम्हाला कळवताना खूप दुःख होत आहे की आमचे वडील डॉ. दिल्ली गणेश यांचे ०९ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री ११ वाजता निधन झाले आहे.” दिवंगत अभिनेत्याचं खरे नाव गणेशन होते. पण दिल्ली गणेश हे रंगमंचाचे नाव त्यांना चित्रपट निर्माते के. बालचंद्र यांनी दिले होते.
दिल्ली गणेशचा जन्म १ ऑगस्ट १९४४ रोजी तामिळनाडूतल्या तिरुनेलवेली जिल्ह्यात झाला. १९७६ मध्ये, दिल्ली गणेशने दिग्गज दक्षिण चित्रपट निर्माते बालचंदर यांच्या ‘पट्टिना प्रावेशव’ (Pattina Pravesham)चित्रपटातून आपल्या फिल्मी करियरची सुरुवात केली. यानंतर त्यांनी अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम करून आपल्या शानदार अभिनयामुळे प्रसिद्धीझोतात आले. दिल्ली गणेश राजधानी दिल्लीतील दक्षिण भारत नाटक सभेचे सदस्य होते. दिल्ली गणेश शेवटचे २०२४ मध्येच रिलीज झालेले तमन्ना भाटिया आणि राशि खन्ना यांचा हॉरर कॉमेडी चित्रपट ‘अरनमाई ४’ आणि कमल हासन स्टारर ‘इंडियन २’ चित्रपटामध्ये ते दिसले होते.
हे देखील वाचा – बिग बॉसच्या घरात दिग्विजय राठी आणि विवियन डिसेना भिडणार!
अभिनेता म्हणून फिल्मी दुनियेत येण्यापूर्वी दिल्ली गणेश यांनी भारताच्या हवाई दलातसुद्धा सेवा बजावली होती. १९६४ ते १९७४ अशी सुमारे १० वर्षे त्यांनी भारतीय हवाई दलात सेवा बजावली. सहाजिकच इतक्या दिग्गज अभिनेत्याच्या निधनाने चाहत्यांसह इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनाही मोठा धक्का बसला असेल.