
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
दिग्दर्शक श्रीकांत ओडेला यांनी नॅचरल स्टार नानी यांच्या वाढदिवसानिमित्त व्यक्त केलेल्या भावनिक भावना सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. आपल्या आगामी महत्त्वाकांक्षी चित्रपट ‘द पॅराडाइज’ संदर्भात बोलताना श्रीकांत यांनी अनेक अनपेक्षित खुलासे केले. या चित्रपटासाठी त्यांनी नानी यांच्या काम करण्याच्या पद्धतीपासून ते त्यांच्या चित्रपटांच्या रिलीज पॅटर्नपर्यंत अनेक प्रस्थापित नियम मोडले, असे त्यांनी स्पष्ट सांगितले. मात्र या सर्व प्रयोगांदरम्यान नानी यांनी त्यांच्यावर दाखवलेला अढळ विश्वासच त्यांना सतत प्रेरणा देत राहिला.
नानी यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीकांत यांनी सोशल मीडियावर चित्रपटाच्या सेटवरील एक भावनिक छायाचित्र शेअर केले. त्यासोबत त्यांनी मनापासून लिहिलेल्या संदेशात म्हटले, “‘नी इष्टम श्रीकांत’ हे तुम्ही जेव्हा म्हणता, तेव्हा मला नेहमी ‘मला तुझ्यावर विश्वास आहे’ असंच ऐकू येतं.” हा विश्वासच ‘‘द पॅराडाइज’साठी स्वतःला पूर्णपणे झोकून देण्याची प्रेरणा देतो, असे ते पुढे म्हणाले आहेत.
श्रीकांत यांनी सांगितले की त्यांनी नानी यांच्या कामाचे दिवस बदलले, शूटिंगची रचना बदलली आणि रिलीजची रणनीतीही बदलली. लूकबाबतही त्यांनी धाडसी प्रयोग केले. वेण्या ठेवण्यापासून हातावर टॅटू काढण्यापर्यंत त्यांचा आकर्षित लूक तयार केला. असंख्य रीटेक्स घेत असतानाही नानी यांचे एकच उत्तर असायचे, “ओके रा, नी इष्टम.” या शब्दांतून दिसणारा विश्वास आणि संयम यामुळेच हा चित्रपट अधिक सक्षम होत असल्याचे श्रीकांत यांनी नमूद केले. “मी कधी थेट सांगितलं नाही, पण आज कबूल करतो मी आयुष्यभर हा प्रश्न विचारत राहीन की तुम्ही माझ्यावर इतका विश्वास का ठेवता,” असे भावनिक शब्द त्यांनी लिहिले.
Nani Anna, Nuvvu “Ni istam Srikanth” ani anna prathisari I hear “I trust you Srikanth” And that trust scares me, every single second to give my blood and soul to The Paradise. I broke your every rule of cinema. I broke your working days pattern… I broke your release date… pic.twitter.com/p7Z1pFKrx8 — Srikanth Odela (@odela_srikanth) February 24, 2026
ब्लॉकबस्टर दसरा नंतर श्रीकांत ओडेला आणि नानी ही जोडी पुन्हा एकत्र येत असल्याने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. ‘दसरा’ने बॉक्स ऑफिसवर आणि समीक्षकांकडून मोठं यश मिळवलं होतं. त्यामुळे ‘द पॅराडाइज’ कडून अपेक्षा अधिकच वाढल्या आहेत. हा चित्रपट केवळ व्यावसायिकदृष्ट्या नव्हे तर कलात्मक पातळीवरही मोठा ठरेल, अशी चर्चा आहे.
या चित्रपटाला लोकप्रिय संगीतकार अनिरुद्ध रविचंदर यांचे संगीत लाभणार आहे. त्यांच्या दमदार आणि आधुनिक धाटणीच्या संगीतामुळे चित्रपटाला वेगळी ऊर्जा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच गायक अर्जुन चंडी यांच्या आवाजामुळे साउंडट्रॅक अधिक प्रभावी होणार असल्याची माहिती आहे.
‘SLV सिनेमाज’च्या बॅनरखाली तयार होत असलेला ‘द पैराडाइज़’ हा चित्रपट २१ ऑगस्ट २०२६ रोजी मोठ्या प्रमाणावर प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तमिळ, इंग्रजी, स्पॅनिश, बंगाली, कन्नड आणि मल्याळम अशा आठ भाषांमध्ये रिलीज केला जाणार आहे. जागतिक स्तरावर पोहोच वाढवण्यासाठी हॉलीवूड स्टार रायन रेनॉल्ड्स यांच्याशी आंतरराष्ट्रीय प्रमोशनसाठी संपर्क साधल्याचीही चर्चा रंगली आहे.