फोटो सौजन्य - Social Media
२०२५ सालचा सर्वोत्तम नागरिक सन्मान हा एक प्रेरणादायी कार्यक्रम ठरला, ज्यात देशासाठी निःस्वार्थपणे योगदान देणाऱ्या खऱ्या नायकांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन प्रसिद्ध समाजसेविका आणि “मदर ऑफ ऑर्फन्स” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सीमा सिंह यांनी मुंबईतील होटेल सहारा स्टार येथे केले.
कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या विचारप्रवर्तक भाषणाने झाली. त्यांनी सीमा सिंह यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करताना जबाबदार नागरिक होण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यानंतर भाजप मुंबई अध्यक्ष आणि आमदार आशीष शेलार यांनी स्थानिक नेतृत्व आणि जनसहभागाच्या गरजेवर भाष्य केले.
या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित व्यक्तींचा गौरव करण्यात आला. पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर (ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ), पद्मभूषण डॉ. विजय भटकर (भारतातील पहिल्या स्वदेशी सुपरकॉम्प्युटरचे जनक), पद्मश्री डॉ. शंकर महादेवन (प्रसिद्ध गायक व संगीतकार), पद्मभूषण अनुपम खेर (ज्येष्ठ अभिनेते व प्रेरणादायी वक्ते), पद्मश्री विजेंदर सिंग (ऑलिम्पिक पदकविजेता बॉक्सर) आणि इम्तियाज अली (सामाजिक आशय असलेल्या चित्रपटांचे प्रसिद्ध दिग्दर्शक) या सर्व प्रतिष्ठित व्यक्तींचा सम्मान करण्यात आले. तसेच त्यांना गौरवण्यात आले आहे.
सीमा सिंह यांनी आपल्या विधानांमध्ये म्हटले आहे की, “हा मंच केवळ प्रसिद्ध व्यक्तींसाठी नाही, तर अशा नायकांसाठी आहे जे समाजात शांतपणे, कुठलाही गाजावाजा न करता बदल घडवत आहेत.” त्यांच्या मेघाश्रेय फाउंडेशनच्या माध्यमातून त्या गेल्या अनेक वर्षांपासून बालकल्याण, महिला सशक्तीकरण, ग्रामीण विकास आणि आरोग्य सेवा यांसारख्या क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहेत.
हा कार्यक्रम केवळ सन्मान वितरणासाठी नव्हता, तर तो एक सामूहिक प्रेरणास्थळ ठरला. विविध भाषणं, सांस्कृतिक कार्यक्रम आणि भावनिक क्षणांनी संपूर्ण संध्याकाळ खास झाली. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांच्या मनात एकच विचार रुजला “खरे नायक हे प्रसिद्धीच्या झोतात नसतात, ते समाजासाठी कार्य करीत असतात… निःस्वार्थपणे.” हा बहुमोलाचा संदेश या कार्यक्रमातून समोर आला. हा सन्मान सोहळा कर्तव्यनिष्ठेच्या आणि समाजसेवेच्या मूल्यमापनाचे प्रतिक ठरला.