‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. प्रदर्शित झाला तेव्हापासुन त्यावर बंदी घालण्याची मागणी होताना दिसत आहे. अनेक राज्यांनी त्यावर बंदीही घातली आहे. या बाबत आता मोठी अपडेट समोर येत आहे. चित्रपटाच्या क्रू मेंबरला धमकीचा मेसेज आल्याची माहिती समोर आली आहे. क्रू मेंबरला घराबाहेर न पडण्याचा इशारा देण्यात आला. चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी पोलिसांना माहिती दिली. यानंतर क्रू मेंबरला पोलिसांनी सुरक्षा पुरवण्यात आली आहे.
पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी यांनी सोमवारी (8 मे) द केरला स्टोरी या चित्रपटावर बंदी घातली. आता चित्रपट यापुढे पश्चिम बंगालमधील कोणत्याही चित्रपटगृहात प्रदर्शित होणार नाही. या प्रकरणी ममता बॅनर्जी म्हणतात की, द केरला स्टोरी या चित्रपटावर द्वेष आणि हिंसाचाराची कोणतीही घटना टाळण्यासाठी आणि राज्यात शांतता राखण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.तामिळनाडू सरकारनेही द केरला स्टोरी चित्रपटाबाबत कठोर पावले उचलली आहेत. तमिळनाडू सरकारनेही या चित्रपटावर बंदी घातली आहे. त्यामुळे केरळमध्येही या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी होत आहे. केरळचे राजकीय पक्ष या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी सातत्याने करत आहेत. चित्रपटात एका विशिष्ट समुदायाविरुद्ध आक्षेपार्ह गोष्टी दाखवण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
चित्रपटाच्या ट्रेलरनुसार, चित्रपटात काही हिंदू मुली दाखवल्या आहेत. या बहुतेक मुलींचं कथितरित्या धर्मांतर केले गेले आणि नंतर इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेत भरती करण्यात आले आणि त्यांना अफगाणिस्तान आणि सीरिया सारख्या ठिकाणी पाठवण्यात आल्याचं चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. त्यावरुन हा सगळा वाद सुरू झालेला आहे. सुदीप्तो सेन यांनी या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित असल्याचा दावा करण्यात येत आहे.