प्रदर्शनाआधीच ‘तिचं शहर होणं’ची राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये बाजी
सोनाली कुलकर्णी आणि हेमांगी कवी मुख्य भूमिकेत असणाऱ्या ‘तिचं शहर होणं’ चित्रपटाची सध्या पुन्हा एकदा चर्चा होत आहे. गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये आपली मोहोर उमटवल्यानंतर आता ह्या चित्रपटाने आणखी एका फिल्म फेस्टिव्हलमध्ये आपला डंका वाजवला आहे. रसिका आगाशे दिग्दर्शित ‘तिचं शहर होणं’ चित्रपटाला ५९ वा राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात तीन पुरस्कार मिळाले आहेत.
५८ वे आणि ५९ वे राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा काल (२१ ऑगस्ट) पार पडला. वरळीच्या डोम एसव्हीपी स्टेडियम येथे झालेल्या दिमाखदार सोहळ्यात या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांच्यासह चित्रपट क्षेत्रातील दिग्गज मान्यवर या सोहळ्यामध्ये उपस्थित झाले होते.
हे देखील वाचा – आनंद एल राय समर्थित ‘फिर आयी हसीन दिलरुबा’ OTT वर गाजवतेय अधिराज्य!
अभिनेत्री हेमांगी कवी आणि सोनाली कुलकर्णीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. हेमांगी कवी पोस्ट शेअर करत म्हणते, “५९वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार ‘सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री’ ‘तिचं शहर होणं’ खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र शासन, परिक्षक! महाराष्ट्र राज्य पुरस्कार, महाराष्ट्र शासन, राज्य पुरस्कार, चित्रपट, तिचं शहर होणं”
तर शेअर केलेल्या पोस्टमध्ये सोनाली कुलकर्णी म्हणते, “महाराष्ट्र शासन – सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, स्मिता पाटील पुरस्कार, सोनाली कुलकर्णी – तिचं शहर होणं… सर्वोत्कृष्ट पटकथा – रसिका आगाशे, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – हेमांगी कवी, सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक – रसिका आगाशे” दोघींच्याही पोस्टवर अनेक मराठी सेलिब्रिटींनी कौतुकाचा वर्षाव केला असून त्यांच्यावर अभिनंदानाचा वर्षाव केला आहे.
रसिका आगाशेंनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून त्यांचा हा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट आहे. या सिनेमात महत्वपूर्ण भूमिकेत, सोनाली कुलकर्णी, प्रसाद ओक, हेमांगी कवी, छाया कदम आणि ओंकार गोवर्धन आहेत. चित्रपटाचे कथानक शहरातील आहे. वर्ग, जात, धर्म, संस्कृती, जीवनशैली, उच्चभ्रू वस्ती, झोपडपट्ट्या आणि गृहनिर्माण सोसायट्या अशा विविध ठिकाणी विभागलेलं शहर आपल्या अस्तित्वासाठी आवश्यक असलेला समतोल शोधण्यासाठी संघर्ष करताना दिसून येतं. हा संघर्ष मूक समाजाचा आहे. ‘तिचं शहर होणं’ चित्रपटात मूक समाजाची कथा आहे.