
फोटो सौजन्य - Social Media
TVF (द व्हायरल फीव्हर) आजच्या घडीला भारतातील सर्वात प्रभावी आणि विश्वासार्ह कंटेंट क्रिएशन प्लॅटफॉर्मपैकी एक मानले जाते. दर्जेदार, वास्तवाशी जोडलेला आणि तरुणाईची नाडी ओळखणारा कंटेंट ही TVF ची ओळख आहे. मात्र केवळ कंटेंटपुरतेच नव्हे, तर अभिनय क्षेत्रात भक्कम ठसा उमटवणारे अनेक कलाकार घडवण्यातही TVF चे मोठे योगदान आहे. गेल्या दशकभरात TVF हे अनेक कलाकारांसाठी यशस्वी ‘लॉन्चिंग पॅड’ ठरले आहे.
सध्या ‘तेरे इश्क़ में’ आणि आगामी ‘बॉर्डर 2’मुळे चर्चेत असलेला परमवीर चीमा हा त्याचाच एक उत्तम उदाहरण आहे. TVF च्या Sapne Vs Everyone या सीरिजमधील भूमिकेमुळे तो प्रेक्षकांच्या नजरेत आला. TVF मुळे मिळालेल्या ओळखीचा योग्य वापर करत त्याने मुख्य प्रवाहातील सिनेसृष्टीत स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.
TVF मधून घडलेला सर्वात लोकप्रिय चेहरा म्हणजे जितेंद्र कुमार. ‘जीतू भैय्या’ किंवा ‘सचिव जी’ म्हणून घराघरात पोहोचलेला जितेंद्र कुमार TVF Pitchers, Kota Factory आणि Panchayatमुळे प्रचंड लोकप्रिय झाला. पुढे शुभ मंगल ज़्यादा सावधानसारख्या चित्रपटांमधून त्याने सिनेमातही आपली पकड मजबूत केली. नवीन कस्तुरिया हा TVF चा आणखी एक मजबूत स्तंभ मानला जातो. TVF Pitchers, Aspirants, Bose: Dead/Alive यांसारख्या वेब सीरिजमधून त्याने अभिनयाची खोली दाखवून दिली. त्याची निवडलेली पात्रे आणि सहज अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.
सुमीत व्यासला Permanent Roommates आणि TVF Triplingमुळे विशेष ओळख मिळाली. पुढे English Vinglish, Parched, Veere Di Wedding यांसारख्या चित्रपटांतून त्याने स्वतःला बहुआयामी अभिनेता म्हणून सिद्ध केले.
अमोल पराशरला Triplingमधील चितवन शर्मामुळे मोठा ब्रेक मिळाला. वेब आणि सिनेमांमधील त्याची निवड आणि अभिनय सातत्याने लक्षवेधी ठरत आहे. Sardar Udhamमधील भूमिकेमुळे त्याच्या कामाला विशेष दाद मिळाली. गजराज राव यांना TVF मुळे नव्याने लोकप्रियता मिळाली. TVF Tripling आणि इतर शोजमधील भूमिकांनंतर बधाई होसाठी मिळालेला Filmfare पुरस्कार हा त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरला.
याशिवाय रंजन राज, आदर्श गौरव, चंदन रॉय, आशीष वर्मा, विक्रम सिंह चौहान यांसारख्या कलाकारांनीही TVF च्या माध्यमातून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. आदर्श गौरवने The White Tigerमधून आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावले, तर चंदन रॉय Panchayatमधील ‘विकास’मुळे घराघरात पोहोचला. एकूणच पाहता, TVF ची जर्नी केवळ यशस्वी वेब सीरिजची नाही, तर अभिनय क्षेत्रात नवे, सक्षम आणि वास्तववादी कलाकार घडवण्याची आहे. म्हणूनच TVF आजही प्रेक्षकांच्या मनात खास स्थान राखून आहे.