(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
कुरळे बंधूंची केमिस्ट्री म्हणजे केवळ नात्याची गोष्ट नाही, तर धमाल मस्ती, खट्याळ टोमणे आणि मनमोकळ्या आनंदाचा जल्लोष चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. हाच जल्लोष आता ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ या बहुप्रतीक्षित मराठी चित्रपटाच्या नव्या प्रमोशनल गाण्यातून प्रेक्षकांसमोर आला आहे. आधीच टीझर आणि ट्रेलरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातल्यानंतर, हे उत्साही प्रमोशनल साँग सध्या प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
या गाण्याला अवधूत गुप्ते यांच्या खणखणीत आणि ऊर्जावान आवाजाने खास रंगत आली आहे. गौरव चाटी आणि आदित्य बेडेकर यांच्या संगीताने गाण्याला धमाल संगीत दिले असून, विक्रांत हिरनाईक यांच्या साध्या पण हृदयाला भिडणाऱ्या शब्दांतून तीन भावांमधील निरागस नातं, घट्ट बॉण्डिंग आणि खट्याळ केमिस्ट्री प्रभावीपणे उलगडते. हे गाणं ऐकताना पाय थिरकतात आणि चेहऱ्यावर हसू अचानक उमटते, म्हणूनच हा ट्रॅक खऱ्या अर्थाने ‘फील गुड’ ठरतो आहे.
‘Kohrra 2’ trailer: ३ वर्षांनंतर पुन्हा उलगडणार सत्य… मोना सिंग आणि बरुण सोबती घेणार सत्याचा शोध
या प्रमोशनल गाण्याची निर्मिती प्रक्रिया देखील तितकीच रंजक आहे. चित्रपटाच्या कथानकात गाण्यासाठी स्वतंत्र सीन नसल्यामुळे प्रमोशनल साँग करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, चित्रपटातील पहिलं गाणं अजय अतुल यांचं असल्याने ते आधीच प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलं आहे. त्यामुळे त्याच भावविश्वाशी सुसंगत, पण वेगळ्या ढंगात सादर होणारं गाणं तयार करण्याचं आव्हान होतं.
याविषयी दिग्दर्शक अंकुश चौधरी म्हणाले, “चित्रपटात गाणं बसवता येईल असा सीन नव्हता, म्हणून प्रमोशनल गाण्याचा विचार केला. पहिलं गाणं प्रेक्षकांना खूप आवडलं होतं, त्यामुळे त्याच भावनेला पुढे नेताना काहीतरी वेगळं करायचं होतं. अजय- अतुल यांच्याशी चर्चा झाली होती, पण त्यांच्या कमिटमेंट्समुळे ते शक्य झालं नाही. एका सेशनदरम्यान चित्रपटातील एक बॅकग्राऊंड ट्यून आठवली आणि त्याच आधारावर हे गाणं तयार करण्याची कल्पना सुचली. यावेळी रोमँटिक झोनऐवजी तीन भावांभोवती फिरणारं, निरागस आणि इनोसंट गाणं करायचं ठरवलं.”
टीझर, ट्रेलरनंतर आता हे प्रमोशनल गाणं ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’बाबतची उत्सुकता अधिकच वाढवत आहे. तीन भावांचा हा मनमोकळा, धमाल आणि भावनिक जल्लोष मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत. हा चित्रपट येत्या ३० जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होत आहे.
Exclusive: नैसर्गिक अभिनय करत ‘मोक्षा’ची भूमिका साकारायची आहे – सानिका काशीकर
चित्रपटात अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव आणि रिंकू राजगुरू यांच्या प्रमुख भूमिका असून संजय नार्वेकर पाहुणे कलाकार म्हणून झळकणार आहेत. सुशीलकुमार अग्रवाल आणि अल्ट्रा मीडिया अॅण्ड एंटरटेनमेंट प्रस्तुत, उषा काकडे प्रॉडक्शन्स, ईओडी. मीडिया उदाहरणार्थ निर्मित आणि अमेय विनोद खोपकर पिक्चर्स यांच्या सहकार्याने हा चित्रपट साकारला गेला आहे. उषा काकडे, पुष्कर यावलकर, सुधीर कोलते, स्वाती खोपकर आणि निनाद नंदकुमार बत्तीन हे निर्माते असून अंकुश चौधरी यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. एव्हीके पिक्चर्सने यापूर्वीही अनेक मनोरंजनात्मक चित्रपट दिले असून, यापुढेही असेच धमाकेदार सिनेमे प्रेक्षकांसाठी घेऊन येण्याची अपेक्षा आहे.






