फोटो सौजन्य - Social Media
स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’ एका मोठ्या वळणावर येऊन पोहोचली आहे. ३० जुलैच्या भागात, प्रिया न्यायालयात आपले सर्व गुन्हे कबूल करते आणि विलास मर्डर केससंदर्भात मधुभाऊ यांनी केलेले सर्व दावे खरे ठरतात. प्रिया आणि साक्षी दोघीही आपले काळे कृत्य मान्य करतात, आणि कोर्टात सत्य उघड होतं.
या प्रकरणानंतर स्टार प्रवाहने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक प्रोमो शेअर केला आहे, ज्यामध्ये प्रिया आणि साक्षी दोघींनाही पोलिस बेड्या घालताना दाखवले आहे. न्यायालयाबाहेर येताना प्रिया ढसाढसा रडते आणि पूर्णा आजी व कल्पना तिच्या चेहऱ्यावर जोरदार कानशिलात लगावतात. फसवणूक इतकी खोलवर पोहोचलेली असते की तिचेच कुटुंब तिला नाकारते.
प्रोमोमध्ये प्रिया सायलीसमोर गयावया करत म्हणते, “मला तुरुंगात जायचं नाही.” त्यावर सायली स्पष्टपणे उत्तर देते, “प्रिया, आता तुला ७ वर्षं तुरुंगात सडायचं आहे, हीच तुझ्यासाठी योग्य शिक्षा आहे.” या घडामोडींनी प्रेक्षक दोन गटांत विभागले गेले आहेत. काहीजण कथानकाचं वास्तवदर्शी वळण कौतुकाने स्वीकारत आहेत, तर काहींना आता चिंता वाटतेय. प्रिया आता तुरुंगात, तर मालिका पुढे कशी जाणार? ७ वर्षांचा लीप घेणार का?
प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया काहीशा अशा होत्या:
“प्रियाला ७ वर्ष शिक्षा, साक्षी पण जेलमध्ये… आता मालिकेचं काय?” मुळात, प्रेक्षकांना असे वाटत आहे की जर दोन्ही व्हिलन तुरुंगात असतील तर मालिकेच्या प्लॉटचे काय होणार? एका युजरने महिपतच्या शैलीत म्हटलं, “११३ टक्के खात्री, ७ वर्षांचा लीप येणार म्हणजे येणार!” तरीही अनेक चाहते अशीही अपेक्षा व्यक्त करत आहेत की लीप येऊ नये. आता लेखक-निर्माते प्रिया तुरुंगात असताना कथेला कोणते वळण देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
‘ठरलं तर मग’ मालिकेतील या मोठ्या ट्वीस्टने संपूर्ण प्रेक्षकवर्गाचं लक्ष वेधलं आहे. आता पुढे काय होणार? मालिका उडी घेणार की तुरुंगातील परिणामांवर लक्ष केंद्रित करणार? हे पाहणं रंजक ठरणार आहे!