भारतातील एकमेव नावहीन रेल्वे स्टेशन! इथे प्लॅटफॉर्म आहे, गाड्याही थांबतात पण तरीही याला नाव नाही...
पश्चिम बंगालमध्ये स्थित हे रेल्वे स्टेशन 2008 पासून कोणत्याही नावाशिवाय कार्यरत आहे. इथे रोज गाड्या थांबतात, प्रवासी उतरतात आणि चढतात, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या स्टेशनला कोणतेही नाव नाही
हे अनोखे रेल्वे स्टेशन पश्चिम बंगालच्या बर्दवान शहरापासून 35 किलोमीटर अंतरावर आहे. त्याचे नाव न देण्यामागचे कारण म्हणजे रैना आणि रायनगर गावांमधील प्रादेशिक वाद.
भारतीय रेल्वेने 2008 मध्ये जेव्हा हे स्थानक बांधले तेव्हा त्याचे नाव "रायनगर" असे ठेवण्यात आले होते, परंतु स्थानिक लोकांनी या नावावर आक्षेप घेत ते बदलण्याची मागणी रेल्वे बोर्डाकडे केली. यांनतर हे प्रकरण कोर्टात गेले आणि तेव्हापासून हे स्टेशन नावाशिवायच सुरू आहे
स्थानकाच्या दोन्ही बाजूला रिकामे पिवळे फलक या वादाची कहाणी सांगतात. येथे प्रथमच उतरणाऱ्या प्रवाशांचा अनेकदा गोंधळ उडतो. आजूबाजूच्या लोकांना विचारूनच ते कुठे आले आहेत ते त्यांना समजते
या स्थानकावर फक्त बांकुरा-मसग्राम पॅसेंजर ट्रेन थांबते, तीही दिवसातून सहा वेळा. रविवारी, जेव्हा स्टेशनवर कोणतीही ट्रेन येत नाही, तेव्हा स्टेशन मास्टर पुढच्या आठवड्याच्या विक्रीसाठी तिकीट खरेदी करण्यासाठी बर्दवान शहरात जातात. विशेष म्हणजे येथे विकल्या जाणाऱ्या तिकिटांवर आजही ‘रायनगर’ हे जुने नाव छापलेले आहे
स्थानकाच्या नामकरणाचा वाद सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. जोपर्यंत यावर निर्णय होत नाही, तोपर्यंत हे ‘नावहीन’ रेल्वे स्थानकच राहणार आहे. हे भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन आहे जे नाव नसतानाही पूर्णपणे कार्यरत आहे