Woman leader Sushila Karki's name preferred as interim Prime Minister after Nepal Crisis
नेपाळमध्ये आंदोलकांनी हिंसाचाराची परिसीमा काढली आहे. रक्तरंजित आंदोलन आणि नेत्यांना केलेली पळता भुई थोडी यामुळे नेपाळी तरुण हे जोरदार चर्चेमध्ये आले आहेत. जाळपोळ आणि गोळीबार यानंतर आता अंतरिम सरकार बनवण्याची तयारी सुरु झाली आहे.
नेपाळचा पंतप्रधान कोण होणार यावर व्हर्चुअल मीटिंगमध्ये सर्वांनुमते सुशीला कार्की यांना पसंती दर्शवण्यात आली आहे. आंदोलकांनी देखील सुशीला कार्की यांनी राज्यकारभार सांभाळावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे नेपाळची धुरा महिला नेत्याकडे जाण्याची शक्यता आहे.
7 जून 1952 रोजी नेपाळमधील बिराटनगर येथे जन्मलेल्या सुशीला कार्की या नेपाळच्या माजी मुख्य न्यायाधीश आहेत. त्या नेपाळच्या पहिल्या आणि एकमेव महिला सीजेआय आहेत. त्यांनी २०१६ मध्ये सीजेआय म्हणून पदभार स्वीकारला.
1972 मध्ये, त्यांनी बिराटनगरमधीलच महेंद्र मोरंग कॅम्पसमधून बीएची पदवी घेतली. त्यानंतर, 1975 मध्ये त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठ, वाराणसी येथून राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली. 1978 मध्ये त्यांनी पुन्हा त्रिभुवन विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. 1979 मध्ये त्यांनी विराटनगर येथे वकिली सुरू केली आणि त्यानंतर सहाय्यक शिक्षिका म्हणूनही काम केले.
2009 मध्ये, त्यांना नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयात तदर्थ न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आले. 2016 मध्ये, त्या त्यांच्या देशाच्या सरन्यायाधीश झाल्या आणि 07 जून 2017 पर्यंत या पदावर राहिल्या. बिराटनगरच्या कार्की कुटुंबातील सुशीला कार्की या त्यांच्या पालकांच्या सात मुलांपैकी सर्वात मोठ्या आहेत.
सुशीला कार्की यांची नेपाळी यांची पंतप्रधानपदाची निवड सोपी असणार नाही. त्यांच्यासह इतर अनेकांची नावे चर्चेमध्ये असणार आहे. यामध्ये कुलमार घिसिंग, सागर ढकाल आणि हरका संपांक यांची नावे देखील शर्यतीमध्ये आहे. मात्र सर्वत्र सुशीला कार्की यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.