Vidhansabha 2024 : ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटात वादाची ठिणगी
पनवेल /दीपक घरत : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पनवेल विधानसभा क्षेत्रात भारतीय जनता पक्ष ताकदीने उतरल्याचे पाहायला मिळत आहे.मात्र त्याच वेळी विरोधी पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव ठाकरे गटातील अंतर्गत हेवे दावे उफाळून आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जिल्हाध्यक्ष शिरीष घरत यांनी भारतीय जनता पक्षातून ठाकरे गटात प्रवेश केलेल्या लीना गरड यांच्या विरोधात वक्तव्य केलं आहे. त्यामुळे ठाकरे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राज्यात झपाट्याने राजकीय वर्तुळात बरीच उलथापालथ होताना दिसतेय.नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीतील घटक पक्षांना मिळालेल्या अनपेक्षित प्रतिसादामुळे आमदारकीचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांच्या आकांक्षा जागृत झाल्या आहेत.परिणामी महाविकास आघाडीतून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवारांची संख्या वाढली आहे.
हेही वाचा-बीडमधून महाविकास आघाडीकडून लढणार? ज्योती मेटे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष शिरीष घरत यांनी पनवेल विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छा व्यक्त केली आहे. इच्छुकांच्या या यादीत भाजपातून ठाकरे गटात प्रवेश केलेल्या माजी नगरसेविका लीना गरड यांचे देखील नाव आहे. निवडणुक लढवण्याच्या दृष्टीने पक्षाच्या वरिष्ठानी कामाला लागण्याचे संकेत गरड यांना देण्यात आल्याचे गरड यांच्या समर्थकांचा दावा आहे. जिल्हाध्यक्ष घरत यांनी मात्र हा दावा खोडून काढला असून,उबाठा गटात प्रवेश केल्या नंतर गरड या करत असलेल्या प्रचारात उबाठा गटाचे पक्ष प्रमुख आणि निवडणूक चिन्ह असलेल्या माशालीचा कुठेच उल्लेख करत नाही. त्यामुळे गरड उमेदवारी बद्दल करत असलेला दावा चुकीचा आहे, असं मत शिरीष घरत यांनी व्यक्त केले आहे.
एकीकडे जिल्हाध्यक्ष करत असलेल्या दाव्या कडे दुर्लक्ष करत माजी नगरसेविका लीना गरड विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जोरदार तयारीला लागल्याचे पाहायला मिळत आहे. गरड यांच्याकडून पनवेल विधानसभा मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूर हे आपण दिलेली आश्वासणे पूर्ण करण्यात कसे अपयशी ठरलेत हे मतदारांच्या मनावर बिंबवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
शेकापमधून इच्छुक बाळाराम पाटील यांच्यावर देखील प्रहार माजी शिक्षक आमदार असलेले शेकाप नेते बाळाराम पाटील हे देखील पनवेल विधानसभा मतदार संघातून महाविकास आघाडीतून आमदारकीची निवडणुक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. पाटील हे तीन वेळा पराभूत झाले आहेत.त्यामुळे असल्याने मी आमदार व्हावे ही शिव सैनिकांची इच्छा आहे, असा प्रहार जिल्हाध्यक्ष घरत यांनी बाळाराम पाटील यांच्यावर केला आहे.