बीडमधून महाविकास आघाडीकडून लढणार? ज्योती मेटे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश (फोटो सौजन्य-X)
पुढील महिन्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षानं जोरदार तयारी केलेली आहे. राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होत आहे. याचदरम्यान दोन तीन दिवसापूर्वी दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या वेळीही त्यांनी शरद पवार गटासोबत चर्चा केली होती. आता विधानसभेवेळी त्यांनी शरद गटात प्रवेश केलाय. शिवसंग्राम संघटनेच्या नेत्या ज्योती मेटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला असून त्यांना बीडमधून उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये नुकत्याच विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रातील सर्व 288 जागांवर मतदान होणार आहे, तर 23 नोव्हेंबरला दोन्ही राज्यांचे निकाल जाहीर होणार आहेत. 2019 मध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढले होते. त्यावेळी शिवसेना एकच होती आणि भाजपने 105 जागा जिंकल्या होत्या. शिवसेनेला 56, काँग्रेसला 44 जागा मिळाल्या. मात्र, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केले. तब्बल अडीच वर्षांनी शिवसेना फोडली आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार स्थापन झाले. शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून अजित पवार गटाने राज्य सरकारला पाठिंबा दिला होता. त्यानंतर अजित पवार उपमुख्यमंत्री झाले.
मराठा आरक्षणाबाबत नेहमी आग्रही राहिलेले शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत विनायक मेटे यांच्या ज्योती मेटे या पत्नी आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी बीडमध्ये तीव्र आंदोलने हे गेल्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळाली. या पार्श्वभूमीवर शरद पवारांकडून मराठा आंदोलनामुळं निर्माण झालेल्या परिस्थितीशी सांगड घालण्यात येतं असल्याचं सांगितलं जातंय.