फोटो सौजन्य सोशल मीडिया
२१ पैकी ८ जागा बिनविरोध झाल्या असून, उर्वरित १३ जागांसाठी २ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर ३ नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात राजकीय वातावरण तापले आहे.
जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला होता. राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यात बैठका झाल्या. मात्र, जागावाटप आणि उमेदवारांच्या निवडीवर एकमत होऊ शकले नाही.
राम शिंदे यांनी कर्जत-जामखेडमधील समर्थक चार उमेदवारांची नावे सोशल मीडियावर जाहीर केल्याने विखे-थोरात गटात नाराजी निर्माण झाली. दुसरीकडे निलेश लंके यांनीही स्वतंत्र राजकीय रणनीती कायम ठेवल्याने निवडणुकीतील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.
‘जयकुमार गोरेंना रोज ३ हजार रुपये देतो, विद्यार्थ्यांसोबत आंदोलनाला बसा’; अतुल लोंढेंचे खुले आव्हान
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आठ जागांवर उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. यामध्ये श्रीरामपूरमधून करण ससाणे, पाथर्डीतून आमदार मोनिका राजळे, बिगरशेती मतदारसंघातून सचिन जगताप, राहात्यातून सुजय विखे पाटील, कोपरगावमधून विवेक कोल्हे, संगमनेरमधून रंजीत देशमुख, नेवासामधून शंकरराव गडाख आणि शेवगावमधून राजश्री घुले पाटील यांचा समावेश आहे.
दरम्यान, राहुल जगताप यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चेनंतर माघार घेतल्याने प्रताप पाचपुते यांचा मार्ग सुकर झाला आहे. मात्र, दत्तात्रय पानसरे यांनी उमेदवारी कायम ठेवल्याने या मतदारसंघातील लढतीचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
राजकीय संघर्षाबरोबरच जिल्हा बँकेच्या आर्थिक व्यवहारांवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. बँकेकडे सुमारे १२ हजार कोटी रुपयांच्या ठेवी असून, जिल्ह्यातील साखर कारखान्यांना दिलेल्या कर्जाचा आकडा पावणेतीन हजार कोटी रुपयांच्या आसपास असल्याचे सांगितले जात आहे.
या कर्जापैकी किती रक्कम थकीत आहे, किती वसुली झाली आणि किती कर्ज नियमित आहे, याबाबत पारदर्शक माहिती समोर येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. संचालकपदासाठी सुरू असलेल्या राजकीय प्रतिष्ठेच्या लढाईत शेतकरी आणि ठेवीदारांच्या हिताकडे दुर्लक्ष होऊ नये, अशी चर्चा सहकार क्षेत्रात सुरू आहे.
आता उर्वरित १३ जागांसाठी २ नोव्हेंबरला होणाऱ्या मतदानाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. विखे-थोरात गटाचे वर्चस्व राहणार की शिंदे-लंके गट बाजी मारणार, याचा फैसला ३ नोव्हेंबरच्या निकालातून होणार आहे.






