'जात पडताळणी समिती रद्द केली तर...'; छगन भुजबळ यांचा जरांगेंच्या मागणीला विरोध
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलन सुरू केले असून, त्यांनी ‘जात पडताळणी समिती’ कायमची रद्द करण्याची मोठी मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीला राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. जात पडताळणी समिती रद्द केली, तर कुणीही बोगस प्रमाणपत्र काढून आदिवासी आणि दलित वर्गामध्ये घुसेल आणि त्यांच्या सवलती बळकावेल,’ अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
माध्यमांशी संवाद साधताना जरांगे यांच्या मागणीवर छगन भुजबळ म्हणाले, ‘जात पडताळणी समिती रद्द केली, तर कुणीही कोणत्याही जातीत प्रवेश करेल. विशेषतः दलित (एससी) आणि आदिवासी (एसटी) घटकांमध्ये जास्तीत जास्त लोक बोगस प्रमाणपत्रे काढून प्रवेश मिळवतील, कारण तिथे केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्वात जास्त सुविधा मिळतात. यापूर्वी अनेक लोकांनी बोगस जात प्रमाणपत्रे काढून एसटी प्रवर्गातून नोकऱ्या मिळवल्या होत्या. हे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत गेले आणि कोर्टाने अशा हजारो लोकांकडून पैसे वसूल करण्याचे आणि त्यांना कामावरून काढण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे १५-२० वर्षे काम केलेल्या लोकांवर मोठे संकट आले होते.”
समिती नसेल तर आरक्षणाला अर्थ नाही
भुजबळ म्हणाले, “तुमच्याकडे ओबीसी किंवा कुणबी असल्याचे योग्य पुरावे आणि कागदपत्रे असतील, तर तुम्हाला प्रमाणपत्र मिळतेच. अनेकदा खऱ्या आदिवासी आणि दलितांनाही कागदपत्रांअभावी प्रमाणपत्र मिळताना अडचणी येतात, पण म्हणून समितीच बरखास्त करणे हा उपाय नाही. समिती नसेल तर एससी, एसटी आणि ओबीसींचा काहीही अर्थ उरणार नाही”.
शरद पवार गटाच्या बैठकीवर सावध प्रतिक्रिया
मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक सुरू असताना या बैठकीत दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाबाबत किंवा एनडीएला पाठिंबा देण्याबाबत चर्चा होणार असल्याच्या प्रश्नावरही भुजबळांना विचारण्यात आले. भुजबळ यांनी या चर्चेबाबत कोणतेही ठोस वक्तव्य केले नाही.
विलिनीकरणासंदर्भात कोणतीही चर्चा नाही
एका कार्यक्रमात ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. चित्तरंजन पुरंदरे यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनाला आपण उपस्थित होतो; मात्र त्याठिकाणी विलिनीकरणासंदर्भात कोणतीही चर्चा झालेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. शरद पवार गटाच्या बैठकीत काय चर्चा होते, याबाबत आपल्याला माहिती नसल्याचेही त्यांनी सांगितले.
‘माझ्याकडे बघू नका बरं का भुजबळ साहेब…’; गिरीश महाजनांचा छगन भुजबळांना मिश्किल टोला






