गिरीश महाजनांचा छगन भुजबळांना मिश्किल टोला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाशिक दौऱ्यादरम्यान एका कार्यक्रमात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या मिश्कील वक्तव्याची चांगलीच चर्चा रंगली. दिंडोरी तालुक्यातील चाचडगाव येथे मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या कृषी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना गिरीश महाजन यांनी मविप्र संस्थेच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचे कौतुक केले. संस्थेने शंभर वर्षांचा टप्पा पूर्ण केला असून लाखो विद्यार्थ्यांनी या संस्थेतून शिक्षण घेतल्याचे त्यांनी नमूद केले. निवडणुकीच्या काळात राजकीय मतभेद असले तरी निवडणुका झाल्यानंतर सर्वांनी एकत्र काम करण्याची गरज असल्याचेही महाजन म्हणाले. याचदरम्यान त्यांनी आपल्या भाषणातून छगन भुजबळ यांच्याकडे मिश्कीलपणे मोर्चा वळवला.
महाजन म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिक्षणासाठी आवश्यक ती मदत करतील. ‘मी पालकमंत्री म्हणून काम करतोय. तुम्ही माझ्या कामाकडे बघा. माझ्याकडे बघू नका, बरं का भुजबळ साहेब…’ असे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. यावेळी टाळ्यांचाही कडकडाट झाला.
Maharashtra Politics : …तर लाखो गाड्या मुंबईत जातील; जरांगे पाटलांचा राज्य सरकारला थेट इशारा
यानंतर महाजन यांनी, ‘मला माहिती नाही यानंतर भुजबळ साहेबांचे भाषण आहे की नाही. नाहीतर ते मला टोमणा मारतील,’ असेही मिश्कीलपणे म्हटले. त्यांच्या या वक्तव्यामुळे कार्यक्रमातील वातावरण काही काळ हलकेफुलके झाले. दरम्यान, आगामी नाशिक कुंभमेळा हा केवळ प्रशासनाचा विषय नसून सर्वांचा आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने योगदान द्यावे, असे आवाहनही महाजन यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मविप्र संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या तत्त्वावर संस्थेचे काम सुरू असल्याचे सांगत त्यांनी संस्थेच्या योगदानाचा गौरव केला. दोन लाखांहून अधिक विद्यार्थी आणि दोन हजारांहून अधिक शिक्षक असलेली ही संस्था राज्यातील अग्रगण्य संस्थांपैकी एक असल्याचे फडणवीस म्हणाले. नाशिक हा कृषीप्रधान जिल्हा असून देशाच्या द्राक्ष निर्यातीपैकी सुमारे 80 टक्के निर्यात नाशिकमधून होते, असा उल्लेखही त्यांनी केला.
शेतीच्या प्रश्नांवर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी कांद्याच्या दराचाही उल्लेख केला. ‘आमच्या डोळ्यांत वर्षातून दोनदा कांदा पाणी आणतो,’ अशी मिश्कील टिप्पणी करत सध्या कांद्याला चांगला भाव असल्याचे ते म्हणाले.
शेतकरी मोठ्या मेहनतीने उत्पादन घेतो, मात्र उत्पादन खर्च वाढत आहे आणि हमीभावाच्या तुलनेत शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण होत नसल्याचेही फडणवीस यांनी नमूद केले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दरांसह अनेक आव्हाने शेती क्षेत्रासमोर असल्याचे त्यांनी सांगितले.






