महाविकास आघाडीत वादाची ठिणगी; 'हा' विषय ठरला चर्चेचं कारण...
गडचिरोली : लोकसभा व विधानसभा निवडणुकीपासून आत्तापर्यंत राजकीयदृष्ट्या शांत राहिलेला गडचिरोली जिल्हा आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राजकीय महासंग्रामासाठी सज्ज झाला आहे. याचे पडसाद मंगळवारी (दि. 7) सोशल मीडियावर पाहावयास मिळाले.
हेदेखील वाचा : ट्रम्प यांना अटक होणार का? सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिला; जाणून घ्या काय होणार पुढे
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या एका नेत्याने माजी काँग्रेसी आमदार तथा विद्यमान भाजप नेत्याविरोधात समाजमाध्यमांवर एक आक्रमक पोस्ट केली. त्यात एकमेकांविरोधात समोरासमोर येण्याचे आव्हान दिले आहे. परिणामी, या पोस्टमुळे राजकीय युद्धाची ठिणगी पडली असून, जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. लोकसभा व विधानसभा निवडणूक आटोपल्यानंतर आता सर्वांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची चाहूल लागली आहे. त्यामुळे जवळपास सर्वच राजकीय पक्षातील नेतेमंडळी, पदाधिकारी व कार्यकर्ते आता प्रचंड सक्रिय झाले आहेत.
आपापल्या परीने कुठल्याही कार्यक्रमात हजेरी लावून हे नेतेमंडळी आगामी निवडणुकीची जोरदार तयारी करत असल्याचे दिसून येत आहे. याच अनुषंगाने गडचिरोली तालुक्यातील मुरमाडी या गावात 27 डिसेंबर 2024 ला आयोजित एका नाट्यप्रयोगाच्या उद्घाटन कार्यक्रमात माजी काँग्रेसी आमदार व विद्यमान भाजप नेत्याने आपल्या वैयक्तिक जीवनावर, कुटुंबावर टीका केली, असा आरोप करत शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याने समाजमाध्यमावर एक पोस्ट केली.
काही क्षणातच पोस्ट प्रचंड व्हायरल
काही क्षणातच ती प्रचंड व्हायरल झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. समाजमाध्यमावर व्हायरल पोस्टमध्ये संबधित नेत्याने चांगलीच आगपाखड केली आहे. या पोस्टमुळे गडचिरोलीचे राजकीय वर्तुळ ढवळून निघाले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आणि त्याच भागातून इच्छुक उमेदवार म्हणून संबंधितांनी केलेली पोस्ट जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी ठरली आहे.
याबाबत दोन्ही संबंधित नेत्यांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. मात्र, ही पोस्ट जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सर्वत्र गाजत असल्याने याचे दूरगामी परिणाम काय होतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बीडचे पडसाद गडचिरोलीत?
सध्या राज्यात बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्याप्रकरण गाजत आहे. याप्रकरणात आंदोलन उभारले असून, बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनीही या आंदोलनात उडी घेतली आहे. राज्य सरकार दरबारी त्याबाबत प्रचंड खलबते सुरू आहेत. स्थानिक एका पोलिस निरीक्षकाने तेथील खासदाराविरोधात समाजमाध्यमावर केलेल्या टिपण्णीमुळे प्रकरण आणखीच चिघळले आहे. त्यामुळे आता गडचिरोलीत नव्याने घडलेले हे प्रकरण बीडचे पडसाद गडचिरोलीत उमटत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळातून उमटत आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : बांगलादेशने भारत आणि इस्रायलच्या ‘या’ शत्रूला केले जवळ; लष्करी सामर्थ्यासाठी करणार करार