
Congress Protest, Gyanesh Kumar, Election Commission
गेल्या आठवड्यात इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानंतर देशभरात खळबळ उडाली आहे. एसआयआरमधील प्रक्रियांविरोधात १४ वेळा आक्षेप घेतल्यानंतरही ज्ञानेश कुमार यांनी कोणतीही सकारात्मक पावले उचलली नाही, असा आरोप इतर दोन निवडणूक आयुक्त सुखबीरसिंग संधू आणि विवेक जोशी यांच्याकडून करण्यात आला होता. निवडणूक आयोगातील हा वाद चव्हाट्यावर आल्याने ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप होऊ लागले.
या आरोपांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या वतीने आज पुणे शहर आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यकर्त्यांनी आज रस्त्यावर उतरून निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. पुणे, सोलापूर, मुंबई, नागपूर अशा अनेक प्रमुख शहरांमध्ये काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त कार्यालयांसमोर निदर्शने केली जात आहे. या कार्यालयांमध्ये निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीत सुधारणा न झाल्यास हा लढा आधिक तीव्र करण्याचा इशाराही कांग्रेसने दिला आहे.
निवडणूक आयोगाच्या गैरकारभाराबाबत काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनीही नुकतीच निवडणूक आयोग आणि भाजपवर सडकून टीका केली होती. निवडणुका निष्पक्ष वातावरणात व्हाव्यात आणि लोकशाही,संविधानाचे रक्षण व्हावे, यासाठी ज्ञानेश कुमार यांनी तातडीने राजीनामा द्यावा, किंवा केंद्र सरकारनेच त्यांना पदावरून हटवावे, अशी मागणी नाना पटोले यांच्या काँग्रेसने आपल्या आंदनलनाच्या माध्यमातून केली.
महाराष्ट्रातही SIR प्रक्रियेनंतर सुमारे २.०७ कोटी मतदारांची नावे प्रारूप यादीत राहिलेली नाहीत. मात्र, ही संख्या अंतिम वगळणी मानू नये, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. या नावांमध्ये मृत, कायमस्वरूपी स्थलांतरित तसेच पत्त्यावर आढळून न आलेल्या मतदारांचा समावेश आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्रातील वगळलेल्या मतदारांची संख्या भविष्यात सुमारे ३ कोटींपर्यंत जाऊ शकते, असा दावा केला आहे. त्यांच्या मते, SIR प्रक्रियेतील पडताळणीबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.