
DCM Ajit Pawar son Jay Pawar gets married in Bahrain marathi political news
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांचे ऋतुजा पाटील यांच्याशी लग्न होणार आहे. जय पवार यांचा विवाह येत्या आठवड्यात थाटात पार पडणार आहे. जय पवार यांचा लग्नसोहळा संपूर्णतः परदेशात होणार आहे. बहरीनमध्ये जय पवार यांचा लग्न सोहळा आयोजित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, पवार कुटुंबाच्या या महत्त्वाच्या सोहळ्याला केवळ मोजक्या 400 पाहुण्यांनाच आमंत्रण देण्यात आले आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी पक्षातून फक्त दोनच नेत्यांना आमंत्रण देण्यात आले आहे. मोजक्या पाहुण्यांमध्ये होणाऱ्या या लग्नाची सध्या राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा आहे.
हे देखील वाचा : राजकीय पक्षांपेक्षा कायदा महत्त्वाचा; टीकाकार नेत्यांना निवडणूक आयोगाचा दणका!
मीडिया रिपोर्टनुसार, अजित पवार यांच्या मुलाच्या लग्नाला राष्ट्रवादी पक्षातून केवळ दोन नेत्यांनाच आमंत्रण देण्यात आले आहे. यामध्ये पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा समावेश आहे. पक्षातील इतर बडे नेते आणि आमदार-खासदारांना निमंत्रण न देण्याचा निर्णय पवार कुटुंबाने घेतला आहे. लग्नाची ई-पत्रिका आणि कार्यक्रमपत्रिका आता समोर आली असून त्यानुसार बहरीनमध्ये चार दिवसांचा भव्य पण खाजगी सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या जय पवार यांच्या पत्रिकेमध्ये कार्यक्रमांचा तपशील देण्यात आला आहे. जय पवारच्या लग्न पत्रिकेनुसार, ४ डिसेंबर रोजी मेहंदी समारंभ पार पडणार आहे. ५ डिसेंबरला हळद, मेहंदी आणि मुख्य विवाह सोहळा पार पडणार आहे. ६ डिसेंबर रोजी संगीत समारंभ होणार आहे. तर ७ डिसेंबरला स्वागत समारंभ आणि रिसेप्शन पार पडणार आहे. परदेशामध्ये हा खाजगी शाही विवाह सोहळा पार पडणार आहे.
हे देखील वाचा : देवेंद्र फडणवीस अन् संजय राऊत यांची खास भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
युगेंद्र पवार यांचा शाही लग्नसोहळा पार
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा विवाह सोहळा दोन दिवसांपूर्वी पार पडला. या विवाह सोहळ्यामध्ये संपूर्ण पवार कुटुंब एकत्र दिसून आले. युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा विवाहसोहळा मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील जिओ सेंटर येथे आयोजित करण्यात आला होता. युगेंद्र पवार यांच्या विवाहसोहळ्याला ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली. या खास कौटुंबिक सोहळ्यासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आले होते. यामध्ये जय पवार, युगेंद्र पवार, पार्थ पवार आणि रोहित पवार एकत्रित दिसून आले. या सोहळ्यामध्ये अजित पवार यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार या देखील सहभागी झाल्या होता. युगेंद्र पवार यांच्या लग्नामध्ये मात्र फक्त अजित पवार यांची अनुपस्थिती होती.