Rupali Chakankar vs Rohini Khadse
मुंबई : राज्यामध्ये लवकरच निवडणूका लागणार असल्यामुळे राजकारण तापले आहे. सत्ताधारी विरुद्ध विरोधातील नेते जोरदार टीका करत आहेत. अनेक नेत्यांमध्ये जुंपली असून राजकीय टीका केली जात आहे. मात्र आता अजित पवार गटातील नेत्या रुपाली चाकणकर आणि शरद पवार गटातील नेत्या रोहिणी खडसे यांच्यामधील वाद विकोपाला गेला आहे. यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असून आता थेट ‘बाप’ काढला जात आहे. या महिला नेत्यांमध्ये वाद विवाद वाढलेला दिसून येत आहे.
राज्य सरकारतर्फे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली. याअंतर्गत प्रत्येक महिलेला महिन्याला दीड हजार रुपये दिले जाणार आहेत. सत्ताधारी महायुतीने याचा जोरदार प्रचार केला असून महाविकास आघाडीने टीकेची झोड उठवली आहे. सरकारकडून दिल्या जाणाऱ्या दीड हजार रुपयांमध्ये काय होतं असा सवाल शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी उपस्थित केला होता. यानंतर रुपाली चाकणकर यांच्याकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. तेव्हापासून या दोन महिला नेत्यांमधील वाद विकोपाला गेला आहे.
काय म्हणाल्या रुपाली चाकणकर?
अजित पवार गटाच्या नेत्या व राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अजित पवार आणि महायुतीवर केलेल्या टीकेचे प्रत्युत्तर दिले. यावेळी रोहिणी खडसे यांचे नाव न घेता त्यांच्यावर एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली. चाकणकर म्हणाल्या की, “सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या माणसाला दीड हजाराची किंमत कशी कळणार? आम्ही आंदोलनातून मोठे झालेलो आहोत. आमच्या वडिलांनी आमच्यासाठी कुठलाही मतदारसंघात ठेवला नव्हता. स्वतःचं कर्तुत्व नसताना वडिलांच्या नावावर सुरक्षित असलेला मतदारसंघ ही त्यांना जिंकता आला नाही, त्यांनी बोलू नये,” अशी घणाघाती टीका रुपाली चाकणकर यांनी केली होती. मुक्ताईनगरमधील एका जाहीर कार्यक्रमामध्ये चाकणकर यांनी रोहिणी खडसे यांच्यावर निशाणा साधला होता. यानंतर आता खडसे यांनी देखील पुन्हा एकदा पलटवार केला आहे.
महिला नेत्या रुपाली चाकणकर आणि रोहिणी खडसे यांच्यामध्ये वादविवाद सुरु आहेत. रुपाली चाकणकर यांच्या जहरी टीकेवर रोहिणी खडसे यांनी पुन्हा प्रत्युत्तर दिले. थेट बाप काढत खडसे यांनी देखील टीका केली. रोहिणी खडसे म्हणाल्या की, “रूपाली चाकणकर या बाप बदलवणाऱ्यांपैकी आहेत. त्यांनी बाप बदलवले असून त्यांना जनाधार नाही, अशा लोकांच्या वक्तव्याला आपण महत्व देत नसल्याचे प्रत्युत्तर रोहिणी खडसेंनी चाकणकरांना दिले आहे.” या महिला नेत्यांमधील आरोप प्रत्यारोपांमुळे सर्वांचे डोळे विस्फारले आहेत. आता रुपाली चाकणकर या टीकेवर प्रत्युत्तर देणार याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरु आहे.