
PM Modi Independence Day Speech, Dimagi Naxal Trend, Dimagi Naxal Party Instagram,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरील भाषणात बोलताना म्हणाले होते की, जंगलात शस्त्रे उचललेल्या नक्षलवाद्यांविरुद्ध देशाने मोठे यश मिळवले आहे, परंतु अजूनही असे ‘दिमागी नक्षल’ आहेत जे विचारधारेच्या माध्यमातून देशात अशांतता पसरवण्याच्या संधी शोधत आहेत. त्यांनी अशा व्यक्तींना ओळखून त्यांना वेगळे करा. त्यांच्यापासून दूर रहा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले होते. पण पंतप्रधानांच्या वक्तव्यानंतर, या शब्दावरून सोशल मीडियावर पुन्हा चर्चा सुरू झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणाला प्रतिसाद म्हणून, सोशल मीडियावर ‘दिमागी नक्षल पार्टी’ नावाचे एक नवीन खाते सुरू करण्यात आले आहे. यापूर्वी, सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या वक्तव्याला प्रतिसाद म्हणून ‘कॉकरोच जनता पार्टी’ सोशल मीडियावर उदयास आली होती.
एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे, “जेव्हा कोणी ‘दिमागी नक्षल’ म्हणते, तेव्हा मला फक्त ‘समजुतदार बंडखोर’ असे ऐकू येते.” @DNJP_India या हँडलने १४,००० हून अधिक फॉलोअर्स मिळवले आहेत. काही खात्यांनी एकता किंवा समर्थन दर्शवण्यासाठी आपल्या नावापुढे ‘दिमागी नक्षल’ जोडले आहे.
दिमागी नक्षल हे इन्स्टाग्राम अकाऊंट कोणी सुरू केले आहे, याची माहिती अद्याप सार्वजनिक करण्यात आलेली नाही. तरी डीएनजेपी आपल्या वेबसाइटवर कॉकरोच जनता पार्टीला आपला बंधू पक्ष म्हणून संबोधले आहे. दुसरीकडे ट्विटर एक्सवरदेखील या नावाने अकाऊंट सुरु करण्यात आले आहे. रविवारी करण्यात आलेल्या पहिल्या ट्विटमध्ये, “जर सर्व बुद्धिमान नक्षलवादी एकत्र आले तर काय होईल?”अशी पोस्ट करण्यात आली होती. लक्षणीय बाब म्हणजे, १६ मे रोजी अभिजीत दिपके यांनीदेखील असेच ट्विट केले होते. त्या ट्विटमधून सीजेपीची सुरुवात झाली होती. 16मे 2026 रोजी अभिजीत दिपके यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून “जर सर्व झुरळे एकत्र आली तर काय होईल?” असे ट्विट केले होते. तिथून सीजेपीच्या मोहिमेला सुरुवात झाली होती.
पण दिमागी नक्षलच्या अकाऊंटवर एक खास बाब नोंदवण्यात आली आहे. या पक्षाला कोणताही ध्वज किंवा फॉन्ट नसेल आणि कोणताही संस्थापक माध्यमांशी बोलणार नाही. पक्षात सामील होण्यासाठी फक्त दोनच आवश्यकता आहेत: “एक कार्यरत बुद्धी आणि ‘थांबा, असे का?’ असा प्रश्न विचारण्याची तयारी.”
‘बुद्धिमान नक्षलवादी’ (Intellectual Naxalite) आणि ‘राष्ट्रविरोधी’ यांसारख्या आक्षेपार्ह संज्ञांचा वापर एखाद्या विशिष्ट पक्षापुरता मर्यादित नसून, राजकीय विरोधक व टीकाकारांचा आवाज दडपण्यासाठीच सर्वच स्तरांवर केला जातो, असा दावा ‘डीएनजेपी’ने (DNJP) केला आहे. संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीनुसार, भारतीय राजकारणातील प्रत्येक राजकीय गटाने किंवा विचारसरणीने वेगवेगळ्या वेळी आपल्याशी मतभेद व्यक्त करणाऱ्या दुसऱ्या गटाला देशद्रोही किंवा राष्ट्रविरोधी ठरवण्याचा प्रयत्न केला आहे.